गॅस ई-केवायसी केवळ 45 टक्केच पूर्ण

गॅस ई-केवायसी केवळ 45 टक्केच पूर्ण

गॅसग्राहक निरुत्साही; मात्र ई-केवायसी करणे बंधनकारक
बेळगाव : गॅस वितरणात सुरळीतपणा आणण्यासाठी गॅस ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र गॅसग्राहक याकडे पाठ फिरवित असल्याने आतापर्यंत केवळ 45 टक्केच ई-केवायसीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र उर्वरित ग्राहकांनी तातडीने ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन गॅस एजन्सींनी केले आहे.गॅस वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी मागील 4 महिन्यांपासून ई-केवायसीचे काम सुरू झाले आहे. मात्र याबाबत गॅसग्राहकच निरुत्साही असल्याचे दिसत आहे. त्यामुळे गॅस ई-केवायसीचे काम संथगतीने सुरू आहे. याबाबत शहर आणि परिसरात गॅस विक्रेत्यांकडून जागृती केली जात आहे.
शिवाय गॅसग्राहकांना ई-केवायसीसाठी सूचनादेखील करण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप ग्राहकांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत गॅसधारकांना 300 रुपये सबसिडी दिली जाते. या ग्राहकांनादेखील गॅस ई-केवायसी अनिवार्य आहे. गॅस ई-केवायसीसाठी आधारकार्ड, मोबाईल क्रमांक, गॅस पासबुक, ग्राहकांचे फेस रिडींग किंवा अंगठ्याचा ठसा आवश्यक आहे. सुरुवातीच्या काळात ई-केवायसीचे काम गॅस कार्यालयात देण्यात आले होते. मात्र ग्राहकांनी गर्दी केल्यामुळे हे काम गॅस वितरकांकडे सोपविण्यात आले आहे. मात्र गॅसग्राहक वेळेत घरी राहत नसल्याने वितरकांनाही अडचणी येऊ लागल्या आहेत. घर बसल्या ई-केवायसी करता यावी, यासाठी अॅप तयार करण्यात आले आहे. अॅप डाऊनलोड करून स्वत:च्या मोबईलवरूनदेखील ई-केवायसी करणे शक्य आहे.
वेळेत ई-केवायसी करणे आवश्यक
शहरात मोठ्या प्रमाणात गॅसग्राहकांची संख्या आहे. सर्व ग्राहकांना ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र अद्यापही निम्म्याहून अधिक ग्राहकांनी आपल्या गॅसची ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे पुढील अडचणी टाळण्यासाठी वेळेत ई-केवायसी करणे आवश्यक आहे.