अंगणवाडी सेविका-मदतनीसांच्या रिक्त जागांसाठी भरती

अंगणवाडी सेविका-मदतनीसांच्या रिक्त जागांसाठी भरती

ऑफलाईन अर्ज भरण्याला प्रारंभ : इच्छुकांची धावपळ
बेळगाव : जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या रिक्त जागांसाठी अर्जाचे आवाहन करण्यात आले आहे. एकूण 197 सेविका तर 600 मदतनीसांच्या जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुकांनी 4 ऑगस्टपर्यंत ऑफलाईन अर्ज करावेत, असे आवाहन बालविकास योजनाधिकाऱ्यांनी केले आहे. जिल्ह्यात अंगणवाडी आणि मदतनीसांच्या रिक्त जागांमुळे कारभार डळमळीत होऊ लागला आहे.
इतर शासकीय सुविधा पुरविताना अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविकांच्या जागा भरण्यात याव्यात, अशी मागणी होत होती. त्यानुसार जिल्ह्यात रिक्त जागांवर अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची नेमणूक केली जाणार आहे. यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. संबंधितांनी महिला व बालविकास खाते किंवा श्रीनगर येथील बालविकास योजना अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
शहरातील 33 अंगणवाडी केंद्रांमध्ये सेविकांची भरती केली जाणार आहे. जाधवनगर, गोंधळी गल्ली, गणाचारी गल्ली, विनायकनगर, शिवबसवनगर, आझमनगर, कंग्राळ गल्ली आदी ठिकाणी असलेल्या केंद्रांमध्ये सेविकांची नेमणूक केली जाणार आहे. काही अंगणवाडी केंद्रांचा सेविकांविना कारभार सुरू आहे. तर काही अंगणवाडी केंद्रांमध्ये मदतनीसांची कमतरता आहे. त्यामुळे अतिरिक्त ताण पडत असून रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.