दोन चोरट्यांना अटक, 6 लाखांचा ऐवज जप्त

दोन चोरट्यांना अटक, 6 लाखांचा ऐवज जप्त

खडेबाजार, कॅम्प, बेळगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई : हिंडलगा कारागृहात रवानगी
बेळगाव : शहरामधील विविध पोलीस स्थानकांच्या हद्दीमध्ये चोरी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून 6 लाख 7 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. खडेबाजार, कॅम्प आणि बेळगाव ग्रामीण पोलिसांनी तपास करून या अट्टल चोरट्यांना अटक केली आहे. चेतन मारुती शिंदे (वय 26, रा. मूळगाव शिवनगर, किणये, सध्या रा. सरस्वतीनगर गणेशपूर), करण उर्फ उत्तम मुतगेकर (वय 27 रा. रघुनाथ पेठ, अनगोळ) असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. त्यांनी रामलिंगखिंड येथील एक घर फोडून सोने व चांदीचा ऐवज लांबविला होता. कॅम्प पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्येही घरफोडी केली होती. तसेच बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीतही या दोघा चोरट्यांनी घर फोडून किमती ऐवज लांबविला होता.
पोलिसांनी या चोरी प्रकरणांचा शोध लावताना या दोघा चोरट्यांनी चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले. त्यांच्याकडून 5 लाख 54 हजार 400 रुपये किमतीचे 77 ग्रॅम सोन्याचे दागिने, 20 हजार रुपये किमतीचे 200 ग्रॅम चांदी, 20 हजार रुपये किमतीचा एक लॅपटॉप, एक मोबाईल आणि रोख 10 हजार रुपये जप्त केले आहेत. खडेबाजार विभागाचे एसीपी शेखरप्पा एच. यांच्या मार्गदर्शनाखाली खडेबाजार पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर,कॅम्प पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी छडा लावला आहे.या कारवाईमध्ये खडेबाजार पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक आनंद आदगौंड, हवालदार अमरनाथ शेट्टी, रमेश अक्की, मोहन अरगुंडी, श्रीधर तळवार, बरमन्ना सर्वी, संतोष बरगी, विठ्ठल गुडमेत्री, महादेव काशीद यांनी भाग घेतला होता. या चोरट्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.