स्थायी समिती अध्यक्षांची निवडणूक बिनविरोध

स्थायी समिती अध्यक्षांची निवडणूक बिनविरोध

नेत्रावती भागवत, श्रीशैल कांबळे, जयतीर्थ सवदत्ती, बसवराज कामकर यांनी मारली बाजी
बेळगाव : महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजपचेच वर्चस्व असून सर्व स्थायी समित्यांच्या अध्यक्षपदी भाजपच्या नगरसेवकांचीच वर्णी लागली आहे. स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली असून महापौर सविता कांबळे यांनी या सर्व अध्यक्षांची नावे जाहीर केली. मंगळवारी महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये चारही स्थायी समित्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार सकाळी 11 वाजता चारही स्थायी समित्यांचे सदस्य उपस्थित होते. त्यानंतर महापौर सविता कांबळे यांनी विविध स्थायी समित्यांच्या अध्यक्षपदासाठी नावे जाहीर केली. त्याला सर्वांनीच सहमती दर्शविल्याने चारही स्थायी समित्यांची निवडणूक बिनविरोध पार पडली.
अर्थ व कर स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नेत्रावती विनोद भागवत, आरोग्य व शिक्षण स्थायी समितीच्या अध्यक्षपदी श्रीशैल शिवाजी कांबळे, सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या अध्यक्षपदी जयतीर्थ व्यंकटेश सवदत्ती, लेखा स्थायी समितीच्या अध्यक्षपदी रेश्मा बसवराज कामकर यांची निवड करण्यात आली आहे. महानगरपालिकेतील सर्व स्थायी समिती सदस्यांची निवडणूक बिनविरोध पार पाडली होती. 5-2 फॉर्म्युल्यानुसार ही निवडणूक झाल्यानंतर त्यामधील अध्यक्ष निवडीची प्रक्रिया मंगळवारी पार पडली.
महानगरपालिकेतील कौन्सिल विभागाने गेल्या चार दिवसांपासून या निवडणुकीची तयारी सुरू केली होती. चारही स्थायी समित्यांच्या 28 नगरसेवकांना नोटिसा पाठवून देण्यात आल्या होत्या. मंगळवारी सकाळी 11 वा. निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला. या निवडणूक प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी महापौर सविता कांबळे होत्या. त्यांनी प्रत्येक स्थायी समितीच्या अध्यक्षांची नावे जाहीर केली. त्याला संबंधित स्थायी समितीमधील इतर सदस्यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला. त्यामुळे चारही स्थायी समित्यांची निवडणूक बिनविरोध पार पडली. यावेळी उपमहापौर आनंद चव्हाण, माजी आमदार अनिल बेनके, सत्ताधारी गटनेते गिरीश धोंगडी यांच्यासह इतर नगरसेवक उपस्थित होते. निवड झाल्यानंतर या सर्व स्थायी समिती अध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी सर्व अध्यक्षांनी सर्वांना विश्वासात घेऊन कामकाज केले जाईल, असे आश्वासन दिले आहे.