उघड्यावर मासेविक्रीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

उघड्यावर मासेविक्रीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

कॅम्प फिश मार्केटमधील प्रकाराकडे कॅन्टोन्मेंटचे दुर्लक्ष
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये मासेविक्रेत्यांना फिश मार्केट बांधून त्यामध्ये दुकानगाळे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. परंतु, काही विक्रेते फिश मार्केटमध्ये माशांची विक्री न करता फिश मार्केटबाहेर उघड्यावर विक्री करीत आहेत. यामुळे अस्वच्छता व दुर्गंधीचे प्रमाण वाढले आहे. कॅन्टोन्मेंट प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे असे प्रकार घडत असल्याने अधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे. बेळगाव शहरात दोन ठिकाणी मासळी बाजार आहे. कसाई गल्ली व कॅम्प येथील फिश मार्केट या ठिकाणी दुकान गाळे बांधून विक्रेत्यांची सोय करून देण्यात आली आहे. कॅम्प येथील फिश मार्केट हे कॅन्टोन्मेंटच्या अखत्यारित येते. फिश मार्केटमध्ये 18 ते 20 विक्रेत्यांना दुकान गाळे मंजूर करण्यात आले असून मागील अनेक वर्षांपासून मासेविक्रीचा व्यवसाय चालतो. काही विक्रेते अधिक फायद्यासाठी फिश मार्केटच्या प्रवेशद्वारानजीक उघड्यावर मासेविक्री करीत आहेत. याचा फटका फिश मार्केटमधील गाळेधारकांना बसत आहे. ग्राहकाला फिश मार्केट बाहेरच गाठून मासेविक्री केले जात आहेत.  उघड्यावर विक्री होत असल्याने आसपासच्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. माशांचे टाकाऊ पदार्थ दुसऱ्या दिवशी फिश मार्केटसमोरील खुल्या जागेत टाकले जात असल्याचेही दिसत असल्याने कॅन्टोन्मेंट अधिकाऱ्यांचे दुर्लक्षच कारणीभूत आहे.
कारवाईचा निव्वळ फार्स
यापूर्वी अनेक वेळा उघड्यावर मासेविक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कॅन्टोन्मेंट बोर्डने कारवाई केली होती. कारवाईनंतर काही दिवस हे विक्रेते उघड्यावरील विक्री बंद करतात. परंतु, त्यानंतर पुन्हा  उघड्यावर माशांची विक्री सुरू होते. त्यामुळे कारवाईचा निव्वळ फार्स करण्याऐवजी कायमस्वरुपी तोडग्याची मागणी होत आहे.