भाजपकडून समाजात दुही माजविण्याचा प्रयत्न

भाजपकडून समाजात दुही माजविण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा आरोप : राज्यात 20 जागा जिंकण्याचा डी. के. शिवकुमार यांचा विश्वास
बेळगाव : समाजातील सर्व जाती-धर्माला एकत्र घेऊन गेले पाहिजे. त्यांना सामाजिक, आर्थिक स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. तो मनोभाव ठेवून काँग्रेसने वाटचाल केली आहे. यासाठीच गॅरंटी योजना जारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व गटांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगून भाजपने समाजात दुही माजविण्याचे काम केल्याचा आरोप करत भाजपवर हल्लाबोल केला. बेळगाव व चिकोडी या दोन्ही मतदारसंघात विजय मिळविण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रविवारी शहरामध्ये एका खासगी हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या भाजप सरकारकडून राज्यावर नेहमीच अन्याय केला आहे. राज्याकडून केंद्राला मोठ्या प्रमाणात कर मिळतो. तरीदेखील नियमानुसार राज्याला द्यावा लागणारा निधी देण्यात आलेला नाही. 2023-24 या आर्थिक वर्षात 4 लाख 30 हजार कोटी कर राज्याकडून केंद्राला मिळाला आहे. मात्र त्याबदल्यात केंद्र सरकारने राज्याचा वाटा दिलेला नाही. कर्नाटक कर मिळवून देण्यात देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. असे असताना केंद्राकडून दुष्काळ निधी देण्यात पक्षपातपणा करण्यात आला आहे. राज्यामध्ये गंभीर दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्याने 2023 सप्टेंबरमध्ये केंद्राकडे एनडीआरएफ नियमानुसार भरपाईसाठी मागणी करण्यात आली होती. तर केंद्रीय पथकाकडून पाहणी करून केंद्र सरकारला दुष्काळी परिस्थितीचा अहवाल देण्यात आला होता.  अनेकवेळा मागणी करूनही दुष्काळ मदतनिधी देण्यात आला नाही. कृषीमंत्र्यांनी भेट घेतली, स्वत: आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती दिली. आश्वासन देण्यात आले मात्र ते पाळलेले नाही.
यासाठीच सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. न्यायालयाने चपराक दिल्यानंतर केंद्राकडून दुष्काळनिधी देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या भूमिकेवर मुख्यमंत्र्यांनी चांगलाच समाचार घेतला. राज्यामध्ये 25 खासदार असताना राज्याच्या परिस्थितीबाबत आवाज उठविला नसल्याचा आरोपही त्यांनी केला. केंद्र सरकारने अदानी, अंबानी यासारख्या कार्पोरेट धनाढ्यांचे 16 हजार कोटी कर्ज माफ केले आहे. मात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल दिली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. केंद्र सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली. केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ, स्वामीनाथन अहवालाची अंमलबजावणी, महिलांना 1 लाख रुपये यासारख्या जाहीर केलेल्या गॅरंटी योजनांची अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले, भाजपकडून केवळ खोटी आश्वासने देण्यात आली आहेत. कळसा-भांडुरा योजनेसाठी निविदा मागविल्या आहेत. पर्यावरण विभागाकडून क्लिनचिट आलेली नसली तरी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मेकेदाटू यासारख्या पाणीपुरवठा योजना राबविल्या जातील. महिला संरक्षणाला प्राधान्य दिले जाईल. यामध्ये कदापिही तडजोड केली जाणार नाही. मतदारांचा काँग्रेस पक्षावर विश्वास असून राज्यात 20 जागांवर विजय मिळवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार यांनी काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर, प्रियांका जारकीहोळी यांना मतदान करून विजयी करण्याचे आवाहन केले. मंत्री एम. सी. सुधाकर, आमदार राजू सेठ, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे आदी उपस्थित होते.