हेगडे यांच्याकडून राजकीय स्वार्थासाठी परेश मेस्ता मृत्यू प्रकरणाचा वापर

पत्रकार परिषदेत श्रीराम जादुगार यांच्याकडून नाराजी व्यक्त कारवार : कारवार लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे-कागेरी हे राजकीय स्वार्थासाठी परेश मेस्ता (होन्नावर) प्रकरणाचे प्ले कार्ड वापरीत आहेत. याबद्दल हिंदू कार्यकर्ते श्रीराम जादुगार यांनी असमाधान व्यक्त केले. परेश मेस्ता यांचा 6 ते 7 वर्षांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला होता. परेश मेस्ताच्या संशयास्पद मृत्यूनंतर कारवार जिल्ह्यातील होन्नावर, कुमठा, […]

हेगडे यांच्याकडून राजकीय स्वार्थासाठी परेश मेस्ता मृत्यू प्रकरणाचा वापर

पत्रकार परिषदेत श्रीराम जादुगार यांच्याकडून नाराजी व्यक्त
कारवार : कारवार लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे-कागेरी हे राजकीय स्वार्थासाठी परेश मेस्ता (होन्नावर) प्रकरणाचे प्ले कार्ड वापरीत आहेत. याबद्दल हिंदू कार्यकर्ते श्रीराम जादुगार यांनी असमाधान व्यक्त केले. परेश मेस्ता यांचा 6 ते 7 वर्षांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला होता. परेश मेस्ताच्या संशयास्पद मृत्यूनंतर कारवार जिल्ह्यातील होन्नावर, कुमठा, कारवार, शिरसी येथे दंगली उसळल्या होत्या. या प्रकरणाचा राजकीय लाभ भाजपने उठविला होता. आणि राज्याच्या किनारपट्टी जिल्ह्यातील काही आमदार निवडून आले होते. या प्रकरणानंतर तत्कालीन भाजपचे नेते अमित शाह यांनी परेश मेस्ता याच्या घरी भेट देऊन त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. जादुगार हे रविवारी कारवार येथे पत्रकारांशी बोलताना पुढे म्हणाले, तुमच्या राजकीय स्वार्थासाठी मागासवर्गीय युवकांचा वापर करू नका. मेस्ता यांच्या मृत्यूप्रकरणी सुमारे 95 युवकांवर प्रकरणे दाखल करण्यात आली होती. अद्यापही हे युवक कोर्ट कचेरीला हजेरी लावीत आहेत. तथापि, कोणत्याही नेत्याने आम्हाला मदत केली नाही. निवडणूक येताच यांना परेश मेस्ता प्रकरणाची आठवण होते.
विश्वेश्वर हेगडे यांनीही आम्हाला कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. आता राजकीय स्वार्थासाठी आमचा वापर करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याबद्दल खंत व्यक्त करून जादुगार पुढे म्हणाले, परेश मेस्ता प्रकरणावेळी आयजीपी असलेल्या हेमंत निंबाळकर यांनी पुरावे नष्ट केले, असा दावा हेगडे यांच्याकडून केला जात आहे. तसे असेल तर प्रकरणाची योग्यरित्या चौकशी झाली पाहिजे म्हणून कागेरी यांनी संबंधितांना कितीवेळा पत्र लिहिले? हेगडे यांनी मृत्यू प्रकरणासंदर्भात कुणाशी चर्चा केली, असे प्रश्न उपस्थित करून मेस्ता प्रकरणाची आमच्यावर प्रकरणे दाखल केल्याने आमची मोठी धावपळ झाली. निवडणूक तोंडावर येताच भाजपने इतरांच्या मुलाना विहिरीत ढकलू नये, विधानसभेचे अध्यक्ष असताना कागेरी यांनी आमच्यासाठी काय केले, असा सवाल उपस्थित केला. भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर 2020 मध्ये कलम 107 अंतर्गत आमच्यावर प्रकरणे दाखल करण्यात आली. कुमठाचे आमदार दिनकर शेट्टी (भाजपचे) यांनीही आमची काळजी घेतली नाही, असा आरोप केला. यावेळी नित्यानंद पालेकर यांनीही समाजाचे भले होईल, असे राजकारण करण्याचा सल्ला कागेरी यांना दिला. यावेळी विक्रम, राम, नागराज, प्रदीप आदी उपस्थित होते.