‘त्या’ पीडित महिलांना आर्थिक मदतीची घोषणा

‘त्या’ पीडित महिलांना आर्थिक मदतीची घोषणा

काँग्रेस राज्य प्रभारी रणदीप सुरजेवाला यांची पत्रकार परिषदेत माहिती
बेळगाव : निजद खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्याकडून लैंगिक अत्याचार करण्यात आलेल्या  प्रकरणातील पीडित महिलांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे, असे राष्ट्रीय काँग्रेसचे प्रवक्ते व राज्य काँग्रेसचे प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. तर परदेशात पळून गेलेल्या रेवण्णा यांना आणण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. याबाबत केंद्र सरकारने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप त्यांनी केला.  ते पुढे म्हणाले, देश सोडून पळून गेलेल्या आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी राहुल गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. गेल्या 75 वर्षांत कधीही न घडलेले असे हे प्रकरण आहे. हे विशेष प्रकरण असून हजारो महिलांवर अत्याचार करण्यात आला आहे. पीडित महिलांना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडून आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे सुरजेवाला यांनी सांगितले. भाजपकडून संविधान बदलण्याचे वक्तव्य केले जात आहे. आरक्षण संपविण्याची भाषा केली जात आहे. देशातील सर्वात मोठ्या सेक्स स्कँडलचा भांडाफोड झाला आहे. भाजपचा मित्र पक्ष असणाऱ्या निजदचे खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्याबाबतच्या सेक्स स्कँडलची पंतप्रधानांना माहिती असतानाही त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांना देश सोडून जाण्यासाठी भाजपकडून मदत करण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आरोपीला पाठीशी घालत आहेत. इंटरपोलच्या माध्यमातून ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी करून आरोपीला देशात परत का आणले जात नाही, असा सवाल त्यांनी केला.