म. ए. समितीच्या बाईक रॅलीला मराठी भाषिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

म. ए. समितीच्या बाईक रॅलीला मराठी भाषिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बेळगाव : म. ए. समितीच्यावतीने लोकसभा निवडणुकीसाठी महादेव पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून जोरदार प्रचार सुरू केला आहे. रविवारी शहरातून बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी मराठी भाषिकांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून याचा धसका राष्ट्रीय पक्षांनी घेतला आहे. सरदार मैदानापासून या बाईक रॅलीला सुऊवात झाली. यामध्ये शहरासह ग्रामीण भागातील तऊणांनी, म. ए. समितीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठा सहभाग दर्शविला. संपूर्ण शहरांमध्ये ही बाईक रॅली काढण्यात आली. उत्तर आणि दक्षिण या दोन्ही मतदारसंघांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मराठी भाषिकांनी म. ए. समितीच्या उमेदवाराला मोठ्या संख्येने मतदान करण्याचा निर्धार केला. मराठी भाषिकांवरील अन्याय दूर करण्यासाठी महादेव पाटील रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रीय पक्षांच्या आमिषाला बळी न पडता मराठी भाषिकांनी एकजूट दाखवून महादेव पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन करण्यात आले. रॅलीमध्ये भगवे फेटे परिधान करून कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी भगवे ध्वज हातामध्ये घेतले होते. यामुळे सर्वत्र भगवे वातावरण निर्माण झाले होते. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. बाईक रॅलीमध्ये म. ए. समितीचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण शहरातून बाईक रॅली काढून म. ए. समितीने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे.