कोल्हापूर : यड्रावमध्ये कर्नाटकी बेंदुर उत्साहात; बैलांची सवाद्य मिरवणूक
यड्राव; Bharat Live News Media वृत्तसेवा : यड्राव येथे शनिवारी (दि.२२) कर्नाटकी बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच शेतकरी वर्ग बैलाला सजवण्यात मग्न झाला होता. बैलांसह गायी- म्हशींनाही सजवण्यात आले.त्यानंतर शेतकऱ्यांनी सायंकाळी बैलांची सवाद्य बँजो लावून मिरवणूक काढली. यावेळी ‘नाद एकच, बैलगाडा शर्यत’ या गाण्याच्या ठेकावर पशुपालक शेतकऱ्यांनी ताल धरला. दरम्यान सांयकाळी कर तोडणीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
यड्रावसह परिसरात बेंदुर सणानिमित्त मोठ्या प्रमाणात उत्साहाला उधान आले होते. या सणानिमित्त बाजारपेठेत मोठी उलाढाल झाली होती. शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात बैलांना सजवण्यासाठी बैलाच्या अंगावर विविध रंगाने कला कौशल्याने नक्षीकाम केले होते. बैलाच्या पाठीवर झूल घातले होते, तसेच काही हौशी पशुपालकांनी बैलांच्या अंगावर विविध कलाकुसर रंगाने केले होते. ‘नाद एकच, बैलगाडा शर्यत’ असेही बैलांच्या पाठीवर कोरण्यात आले. बैलाच्या गळ्यामध्ये घुंगरूचे कंडे, झूल, हणपट, दावी, मुसकी आणि शिंगातील शेंब्या घालून बैलांना सजवण्यात आले होते. बैल सजावटीनंतर त्याला औक्षण करून नैवेद्य दाखवण्यात आले. तसेच सांयकाळी कर तोडणीचा तसेच १२५ किलो वजनाचा गुंड (दगड) उचलण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी युवकांनी तसेच ग्रमास्थांनी मोठी गर्दी केली होती.