अजित पवारांच्या वर्चस्वाला अखेरचा सुरुंग लावण्याचे शरद पवारांचे मनसुबे

पुणे : अजित पवारांच्या वर्चस्वाला अखेरचा सुरुंग लावण्याचे शरद पवारांचे मनसुबे लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी 1 लाख 58 हजार मतांच्या फरकाने विजय मिळविला. या निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघाने सुळे यांना 48 हजार मतांची आघाडी दिली. आता या आघाडीच्या जोरावरच विधानसभेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील वर्चस्वाला अखेरचा …

अजित पवारांच्या वर्चस्वाला अखेरचा सुरुंग लावण्याचे शरद पवारांचे मनसुबे

मनोज आवाळे

पुणे : अजित पवारांच्या वर्चस्वाला अखेरचा सुरुंग लावण्याचे शरद पवारांचे मनसुबे लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी 1 लाख 58 हजार मतांच्या फरकाने विजय मिळविला. या निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघाने सुळे यांना 48 हजार मतांची आघाडी दिली. आता या आघाडीच्या जोरावरच विधानसभेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील वर्चस्वाला अखेरचा सुरुंग लावण्याचे काम ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी मतदारांचे आभार मानण्यासाठी तीन दिवस बारामती तालुक्याचा दौरा करून सुरू केल्याचे दिसते. ठिकठिकाणी सभा घेत, शेतकर्‍यांशी संवाद साधत, जुन्या सहकार्‍यांच्या घरी भेट देत शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेच पेरणी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
काका विरूद्ध पुतण्या
नुकतीच पार पडलेली बारामती लोकसभेची निवडणूक लक्षवेधी ठरली. या निवडणुकीची सारी सूत्रे शरद पवार यांनीच हाती घेतली होती. त्यामुळे निवडणूक ‘सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार’ यांच्यात झाली असली, तरी ती प्रत्यक्षात शरद पवार व अजित पवार या काका-पुतण्यातच होती. त्यात राजकारणातील महावस्ताद समजल्या जाणार्‍या शरद पवार यांनी पुतण्याला गुगली टाकून क्लीन बोल्ड केले. ज्या बारामती विधानसभा मतदारसंघातून मोठे मताधिक्क्य मिळेल, अशी अजित पवारांना अपेक्षा होती, त्या मतदारसंघानेच त्यांच्याविरोधात कौल दिला.
बारामतीत शरद पवार’च’!
लोकसभा निवडणुकीतील सुळे यांच्या विजयाच्या चौकारामुळे शरद पवार गोटात अतिशय उत्साह संचारला आहे. त्यावर स्वार होत शरद पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात व्यापक जनसंपर्क अभियान राबविले. पहिल्या टप्प्यात दुष्काळी भागाचा दौरा केला. नंतर बारामतीतील व्यापारी व वकिलांचा मेळावा घेतला. त्यानंतर तीन दिवस बारामती तालुक्याचा दौरा केला. या दौर्‍यात राजकीय दृष्ट्या प्रभावी समजल्या जाणार्‍या गावांत त्यांनी सभा घेतल्या तसेच शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्याची ग्वाही दिली. जुन्या मित्रांच्या आठवणींना उजाळा देत काहींच्या घरी आवर्जून भेट दिली. या माध्यमातून त्यांनी जनमानसावरील आपली पकड अधिकच घट्ट करण्याचा प्रयत्न केला.
लोकसभा झाली, आता विधानसभा
या दौर्‍यात त्यांनी घेतलेल्या सभांमध्ये, कोणते बटन दाबायचे ते बारामतीतील मतदारांना सांगावे लागत नाही. लोकसभेला जे केले, तेच विधानसभेला करा. गेली 56 वर्षे जशी साथ दिली, तशीच यापुढेही द्या, असे सांगत आगामी विधानसभा निवडणुकीतील आपले मनसुबे स्पष्ट केले. याबरोबरच बारामती विधानसभेतील संभाव्य उमदेवारालाही त्यांनी प्रोजेक्ट केले. लोकसभा निवडणुकीत जेवढे फिरले नव्हते त्यापेक्षाही अधिक ते आभार दौर्‍यानिमित्त तालुक्यात फिरले. याद्वारे त्यांनी चार महिन्यांनी होणार्‍या विधानसभा निवडणुकीतील प्रचारच एकप्रकारे केल्याचे मानले जात आहे. या माध्यमातून त्यांनी अजित पवार यांना थेट इशाराच दिला असल्याचे दिसते.

हेही वाचा

सरकारविरोधात काँग्रेसचे ‘चिखल फेको’ आंदोलन
Union Budget 2024-25 | बजेटमधून राज्यांच्या काय अपेक्षा?; सीतारामन यांनी घेतली राज्यांच्या अर्थमंत्र्यांसोबत बैठक
रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत मागण्यांचा पाऊस