विरारमध्ये झाड पडून महिलेचा मृत्यू

विरारमध्ये झाड पडून महिलेचा मृत्यू

विरार : Bharat Live News Media वृत्तसेवा ; मागील दोन दिवसांपासून विरार मधून बेपत्ता असलेल्या मंजुळा झा (७०) या महिलेचा मृतदेह शुक्रवारी सकाळी विरारच्या बोळींज येथे आढळला आहे. बुधवारी पावसामुळे चिंचेचे झाड पडून या महिलेचा मृत्यू झाला होता. मात्र ती झाडाखाली दबली गेल्याने दोन दिवस कुणाला समजले नाही.
मंजुळा झा (७०) ही महिला काही दिवसांपूर्वी विरार पश्चिमेच्या पद्मावती नगर येथील ऋषभ टॉवर मध्ये आपल्या मुलाकडे आली होती. सकाळी नातवाला शाळेत सोडून ती मंदिरात जात असे. मंदिरात फुले वाहण्यासाठी ती आसपासच्या परिसरातून फुले तोडून आणत असे. बुधवार १९ जून रोजी ती नेहमीप्रमाणे नातवाला सोडण्यासाठी बाहेर गेली आणि तेव्हापासून ती बेपत्ता झाली होती. तिचा शोध सुरू होता. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार देखील दाखल होती.
तिचा शोध घेत असताना पोलिसांना ती बोळींज येथे फुले तोडण्यासाठी जात असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी त्या परिसरात शोध घेतला असता चिंचेचे मोठे झाड पडलेले दिसले. तेथे शोध घेत असता दुर्गंधी आली. तेव्हा झाड बाजूला केले असता मंजुळा यांचा मृतदेह आढळला.
बुधवारी सकाळी वादळी पावासमुळे हे झाड पडले होते. आम्ही एनडीआरएफच्या मदतीने झाड बाजूला करण्याचे काम सुरू होते. मात्र झाडाच्या प्रचंड फांद्या असल्याने महिला दिसून आली नाही. स्थानिकांनीही झाडाखाली कुणी नसावे असे सांगितले होते, अशी माहिती वसई विरार अग्निशमन विभागाचे प्रमुख दिलीप पालव यांनी दिली.
हेही वाचा 

अजित पवारांच्या वर्चस्वाला अखेरचा सुरुंग लावण्याचे शरद पवारांचे मनसुबे
Neet Exam : ३२ लाखांना विकला गेला ‘नीट’चा पेपर!
Israel-Gaza war: इस्त्रालय सैन्याचा रफाहजवळील तंबुवर हल्ला; २५ ठार, ५० जखमी