सहा मंडळात अतिवृष्टी; शेतकऱ्यांना दिलासा

सहा मंडळात अतिवृष्टी; शेतकऱ्यांना दिलासा

यवतमाळ; Bharat Live News Media वृत्तसेवा: मृग नक्षत्र सुरू झाल्यापासून लांबणीवर पडलेला पाऊस अखेर शुक्रवारच्या मध्यरात्री जिल्ह्यात धो-धो बरसला. यंदाच्या पावसाळ्यातील सर्वाधिक २१.९ मिलीमीटरची नोंद करण्यात आली, तर दारव्हा, नेर आणि बाभूळगाव तालुक्यातील सहा मंडळांत अतिवृष्टी झाली. या पावसामुळे आकाशाकडे नजरा लावून बसलेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
पाऊस वेळेवर येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. जून महिन्यात पाऊस होताच, शेतकरी पेरणीला लागतात. यंदा एक लाख २९ हजार ७२२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. यात १ लाख ६ हजार ३६४ हेक्टर कापूस, १३, ७०० हेक्टर तूर, नऊ हजार हेक्टर सोयाबीन आणि १८ हजार हेक्टरवर ज्वारीची पेरणी केली. पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या.
मध्यरात्रीच्या पावसाने शेतकऱ्यांना काहीं प्रमाणात दिलासा मिळाला आहे. बाभूळगाव तालुक्यातील सावर (७७.२५ मिमी), दारव्हा तालुक्यातील लाडखेड (७८.२५ मिमी), महागाव (७८.२५ मिमी), नेर तालुक्यातील माणिकवाडा (९१.५०), वटफळी (६८.२५ मिमी), मालखेड (९३ मिमी) याप्रमाणे सहा महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे.