जास्त पावसाच्या ठिकाणची पोलीस भरती पुढे ढकलली

जास्त पावसाच्या ठिकाणची पोलीस भरती पुढे ढकलली

मुंबई; Bharat Live News Media वृत्तसेवा : पाऊस जास्त असलेल्या ठिकाणच्या उमेदवारांच्या मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, पावसाचे पुढचे दिवस आणि आचारसंहितेची शक्यता लक्षात घ्यावी लागेल. वेळ घालविल्यास काही उमेदवारांचे वय निघून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिथे पाऊस नसेल तिथे भारती प्रक्रिया सुरू राहील, असे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. राज्यात गृह विभागांतर्गत १७ हजार ४७१ पदांसाठी १९ जूनपासून पोलिस भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, अनेक ठिकाणी पावसामुळे उमेदवारांच्या मैदानी चाचणीत अडथळे येत आहेत. त्यामुळे गुणांकनावर परिणाम होत असल्याने बहुतांश विद्यार्थ्यांनी भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.
या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, ज्या ठिकाणी पाऊस आहे, त्या ठिकाणच्या उमेदवारांच्या मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यापुढे आणखी पाऊस वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होईल. अशावेळी मैदानी चाचण्या आणखी पुढे गेल्या तर वयाच्या अटीमुळे अनेक उमेदवारांच्या भविष्यावर परिणाम होईल. मात्र त्या उमेदवारांना संधी मिळायला हवी, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
पावसामुळे व्यत्यय निर्माण झाला असेल, त्या ठिकाणी मैदानी चाचणी घेण्यासाठी पुढच्या तारखा देण्यात आलेल्या आहेत. पण ज्या जिल्ह्यांत पाऊस नाही, तेथे भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे. तसेच जे विद्यार्थी मैदानी चाचणीसाठी येत आहेत, त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाला सूचना केल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.