एमडीबाबत दोन दिवसांत दुसरी कारवाई; 3 लाखांचा साठा जप्त

एमडीबाबत दोन दिवसांत दुसरी कारवाई; 3 लाखांचा साठा जप्त

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा – एमडी विक्री करण्यासाठी आलेल्या संशयिताला गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने पकडले. शहबाज मजिद पठाण (२७, रा. खडकाळी) असे या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे तीन लाख रुपयांचा एमडी साठा जप्त केला.
गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने रविवार कारंजा परिसरात बुधवारी (दि. १९) सापळा रचून दोन युवकांना पकडले होते. त्यांच्याकडून ३२ ग्रॅम वजनाचा एक लाख ६० हजार रुपयांचा एमडी साठा जप्त केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पथकाने पखाल रोड परिसरात कारवाई केली. विशेष पथकातील हवालदार संजय ताजणे, पोलिस नाईक दिघे व निकम यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पखाल रोड परिसरात गुरुवारी (दि. २०) सायंकाळी सापळा रचला. गुलशन कॉलनी परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्या संशयित शहबाज पठाणला थांबवून त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे दोन लाख ९० हजार रुपयांचा ५८ ग्रॅम वजनाचा एमडी साठा आढळला. हा एमडी साठा विक्रीचा प्रयत्न शहबाज करत असल्याचे आढळून आले. तसेच त्याने मुंबईतील शैलेस तेलोरेकडून एमडी घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. त्यामुळे पोलिसांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात दोघांविरोधात एन. डी. पी. एस. कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी शहबाजला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास पोलिस कोठडी सुनावली आहे.
मुंबईमार्गे एमडी शहरात
विशेष पथकाच्या कारवाईत शहबाजकडे मुंबईतील संशयिताने एमडी पुरवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबईतून एमडी पुरवठा अद्याप सुरू आहे. याआधीही पोलिसांनी कारवाई करीत मुंबईतून काही संशयितांची धरपकड केली. मात्र तरीदेखील हा पुरवठा सुरूच असल्याने याची पाळेमुळे शोधण्याचे आव्हान शहर पोलिसांसमोर आहे.
हेही वाचा:

मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगावजवळ भीषण अपघात; पोलीस हवालदार ठार
छोटा शकीलच्या मेव्हण्याचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन