140 फूट लांबीच्या सापाची प्राचीन कोरीव प्रतिमा
बगोटा : संशोधकांनी व्हेनेझुएला आणि कोलंबियाच्या सीमेवर एका मोठ्या शिळेवरील 140 फूट लांबीच्या सापाची कोरीव प्रतिमा शोधली आहे. ही प्रतिमा तब्बल 2 हजार वर्षांपूर्वीची आहे. त्या काळात येथील परिसरात इतके मोठे सर्प होते की काय, असे आता संशोधकांना वाटत आहे.
संशोधकांनी फोटोग्राफी आणि ड्रोन फुटेजचा वापर करून व्हेनेझुएला आणि कोलंबियामध्ये प्राचीन रॉक आर्टची एक शृंखलाच पूर्णपणे मॅप केली आहे. यामध्ये जातील सर्वात मोठ्या ठरू शकणार्या स्मारकीय कोरीव कामाचाही समावेश आहे. यामध्ये मानव आणि पशूंच्या आकृत्या कोरण्यात आलेल्या आहेत. ओरिनोको दनीच्या काठावर या प्राचीन कलाकृती आहेत. ही नदी दक्षिण अमेरिकेतील या परिसरातून वाहते. जर्नल अंटिक्विटीमध्ये याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे.
संशोधकांनी म्हटले आहे की, याच ठिकाणी विचारपूर्वक हे कोरीवकाम करण्यात आले होते. याचे कारण म्हणजे दूरवरूनही हे कोरीवकाम दिसावे, हा हेतू होता. याच ठिकाणी एक महत्त्वपूर्ण व्यापारी आणि प्रवासी मार्गाचा रस्ता होता. त्याला ‘एट्युर्स रॅपिडस्’ या नावाने ओळखले जाते. यापैकी एक सर्वात मोठे रॉक आर्ट 138 फूट लांबीचे आहे. त्यामध्ये बोआ कंस्ट्रीक्टर व अनाकोंडासारख्या विशाल सापांचा विषय आहे. या परिसरातील काही स्थानिक लोकांसाठी हे सर्प देवता समूहात मोडत होते. यापैकी एका अतिशय मोठ्या सर्प आकृतीने संशोधकांचे लक्ष वेधून घेतले. त्यामध्ये दिसून येते की, ही आकृती 140 फूट सापाची आहे.