वस्ताद, मुरलीधर बोलतोय… मी मंत्री झालो.., शाब्बास रे पठ्ठ्या!

कोल्हापूर : पुण्याचे खासदार नूतन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कोल्हापुरात कसबा बावडा येथील शासकीय कुस्ती संकुलात कुस्तीचे धडे गिरवले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राजकीय गरुडभरारी घेतली आहे. मल्ल, महापौर, खासदार ते केंद्रीय राज्यमंत्री हा त्यांचा प्रवास कुस्तीक्षेत्राला झळाळी देणारा आहे. रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मोहोळ यांनी वस्ताद उत्तम पाटील (कवलापूर, सांगली) यांना फोन …

वस्ताद, मुरलीधर बोलतोय… मी मंत्री झालो.., शाब्बास रे पठ्ठ्या!

एकनाथ नाईक

कोल्हापूर : पुण्याचे खासदार नूतन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कोल्हापुरात कसबा बावडा येथील शासकीय कुस्ती संकुलात कुस्तीचे धडे गिरवले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राजकीय गरुडभरारी घेतली आहे. मल्ल, महापौर, खासदार ते केंद्रीय राज्यमंत्री हा त्यांचा प्रवास कुस्तीक्षेत्राला झळाळी देणारा आहे. रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मोहोळ यांनी वस्ताद उत्तम पाटील (कवलापूर, सांगली) यांना फोन केला. वस्ताद, मुरलीधर बोलतोय… मी मंत्री झालो… हे शब्द कानावर पडताच, वस्ताद म्हणाले, शाब्बास रे पठ्ठ्या! आणि दोघांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले.
खासदार मोहोळ यांनी 1990 मध्ये कोल्हापुरातील रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये अकरावीच्या वर्ग प्रतिनिधीची निवडणूक लढविली आणि विजयी झाले. कुस्तीचे धडे गिरविता गिरविता त्यांनी राजकीय धडेदेखील कोल्हापुरातून गिरविले आहेत. मोहोळ यांचे घराणे कुस्तीप्रेमी त्यामुळे सन 1994-95 मध्ये त्यांना कसबा बावडा येथील शासकीय कुस्ती संकुल केंद्र, कसबा बावडा येथे प्रशिक्षणासाठी दाखल केले. शाहूपुरी तालमीत देखील त्यांचा शड्डू घुमला. पहाटे लवकर उठून ते व्यायाम, कुस्तीचा सराव करून कॉलेजला हजेरी लावत होते. दर मंगळवारी ते अंबाबाई दर्शन आणि कोल्हापुरी मिसळचा आस्वाद आणि अधूनमधून तांबड्या-पांढर्‍या रश्श्यावर ते मित्रांसोबत ताव मारायचे. पुढे ते 1997 पर्यंत कोल्हापुरात कुस्तीचे धडे गिरवत राहिले. यानंतर खासदार मोहोळ यांचा शड्डू विविध कुस्ती स्पर्धांच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रभर घुमला. महाराष्ट्रासह अन्य राज्यांत मोहोळ यांचा कुस्तीचा गोतावळा आहे.
मोहोळ कुटुंबीय कुस्तीशी निगडित असल्याने कुस्तीगीर परिषदेची स्थापना व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरविण्यामागे नात्याने आजोबा असलेले मामासाहेब मोहोळ यांचा सिंहाचा वाटा आहे. स्वतः त्यांनी पुण्यासह सोलापूर, नगर परिसरातील मल्लांकरिता तालमी बांधल्या. त्यामुळे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यातही हा वारसा उपजतच आला. अत्यंत चपळ, शांत स्वभाव आणि कठोर परिश्रम अशीच मुरलीधर मोहोळ यांची सुरुवातीपासूनची ओळख आहे. कुस्ती आखाडा गाजविणारे मुरलीधर मोहोळ हा आपला पठ्ठ्या मंत्री झाल्याने वस्तादांचा देखील ऊर भरून आला आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मोहोळ यांनी वस्ताद उत्तम पाटील यांना फोन करून आपल्या आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली.