शपथविधीआधीच मोदी ३.० सरकारच्या अजेंड्यावर मोहोर

शपथविधीआधीच मोदी ३.० सरकारच्या अजेंड्यावर मोहोर

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) संभाव्य मंत्र्यांसोबत नरेंद्र मोदी यांनी पहिल्या 100 दिवसांच्या रोड मॅपवर महत्त्वपूर्ण चर्चा केली. 100 दिवसांत योजना मार्गी लावण्याबाबतच्या सूचना मोदी यांनी या बैठकीत दिल्या.
मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधी संभाव्य मंत्र्यांसोबत संवाद साधला. या बैठकीत त्यांनी मोदी 3.0 सरकारच्या अजेंड्यावर चर्चा केली. भाजपप्रणीत एनडीए आघाडीला लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले. त्यानंतर रविवारी सायंकाळी शपथविधीच्या आधी मोदी यांनी संभाव्य मंत्र्यांना मार्गदर्शन करून एका प्रकारे कामाचा धडाकाच लावला. मोदी यांनी पहिल्या पाच वर्षांचा आराखडा तयार असल्याचे यावेळी सांगितले.
सरकार स्थापन झाल्यावर पहिल्या 100 दिवसांत कराव्या लागणार्‍या कामांची माहितीही मोदी यांनी यावेळी दिली. यावेळी ते म्हणाले, सरकार स्थापन झाल्यावर झपाट्याने आपणास कामाला लागायचे आहे. प्रलंबित विकासकामे मार्गी लावायची आहेत. 100 दिवसांत वेगळ्या योजनांना मूर्त स्वरूप द्यायचे आहे. लवकरच खातेवाटप केले जाईल. त्यामुळे पदभार स्वीकारल्यांतर कराव्या लागणार्‍या कामांची यादी समोर ठेवून कामाला लागायचे आहे. 2047 पर्यंत देशाला विकसित भारत करण्याचे आपले लक्ष्य आहे, असे मोदी यांनी सांगितले. देशवासीयांनी आपल्यावर विश्वास ठेवला आहे. कामाच्या माध्यमातून जनतेचा विश्वास सार्थ करावा लागणार आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
बिट्टू चक्क धावतच पोहोचले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या मंत्र्यांची बैठक बोलावली. निमंत्रण असलेले पंजाबचे भाजप नेते रवनीतसिंग बिट्टू दिल्लीच्या ट्रॅफिक जाममध्ये अडकले. बैठकीची वेळ पाळण्यासाठी बिट्टू गाडीतून उतरले आणि चक्क धावतच पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले. या धावाधाव प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.