शिवाजी चौकात क्रिकेट प्रेमींचा जल्लोष
कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : ‘आयसीसी’ टी-20 विश्वचषक 2024 मधील भारत विरुद्ध पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना रविवारी न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झाला. अटीतटीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवताच कोल्हापुरातील तमाम क्रिकेट प्रेमींनी छत्रपती शिवाजी चौक येथे जल्लोष केला. आतषबाजी आणि भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा जयघोषाणे क्रिकेट प्रेमींनी चौक दाणणून सोडला होता.
हा सामना उशीरा सुरू झाल्याने मध्यरात्री 1 च्या सुमारास संपला. भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारताच शहरातील विविध भागांतून दुचाकीवरून क्रिकेटप्रेमी हातात तिरंगा घेऊन शिवाजी चौक येथे जमण्यास सुरुवात झाली. काही वेळातच चौक क्रिक्रेट प्रेमींनी भरून गेला. यावेळी आतषबाजी, भारताच्या विजयाचा जयघोष करत क्रिकेट प्रेमींनी एकच जल्लोष केला.
शहरात चोख पोलिस बंदोबस्त
या सामन्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी शहरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भारताच्या विजयानंतर छत्रपती शिवाजी चौक येथे क्रिकेट प्रेमींकडून जल्लोष करण्यात येतो. यामुळे शिवाजी चौकाकडे येणारे सर्व रस्ते बॅरिकेटिंग लावून पोलिसांनी बंद केले होते. मात्र, मोठ्या संख्येने क्रिकेट चाहते जमल्याने पोलिसांनी बॅरिकेटस् हटवावे लागले.