मोदींचे महाराष्ट्राला झुकते माप

मोदींचे महाराष्ट्राला झुकते माप

मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा : महाराष्ट्रातून यावेळी भाजपला अपेक्षित यश मिळाले नसले, तरी येणारी विधानसभा निवडणुका पाहता भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राला झुकते माप दिले आहे. 40 जणांच्या मंत्रिमंडळात राज्याला सहा मंत्रिपदे मिळाली आहेत. त्यात भाजपचे ज्येष्ठ नितीन गडकरी, पीयूष गोयल, रक्षा खडसे, शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव, रिपाईचे नेते रामदास आठवले तसेच पहिल्यांदाच खासदार झालेल्या पुण्यातील मुरलीधर मोहोळ यांचा समावेश आहे. मात्र, केंद्रीय मंत्री राहिलेल्या नारायण राणे यांचा पत्ता कट झाला आहे.
राज्यात महायुतीला 48 पैकी 17 जगांवर समाधान मानावे लागले आहे. महायुतीच्या तब्बल 25 जागा घटल्याने भाजपला केंद्रात देखील स्वबळावर बहुमत मिळविण्यात अडचण निर्माण झाली आहे. मात्र, महाराष्ट्र हे एक महत्वाचे राज्य असून येणारी विधानसभा निवडणूक पहाता महाराष्ट्राला झुकते माप देण्यात आले आहे.
नितीन गडकरी आणि पीयूष गोयल यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश अपेक्षितच होता. दोघांनाही महत्वाची खाती मिळण्याची शक्यता आहे. मात्र, रामदास आठवले यांच्या सारख्या दलित चेहर्‍याचा पहिल्या यादीतच समावेश झाला आहे. भाजप घटना बदलणार असल्याचा प्रचार विरोधकांनी केला. त्याचा फटका भाजपला बसला आहे. आठवले यांना संधी देऊन भाजप सर्व समाजाला सोबत घेऊन जाणार असल्याचा संदेश नरेंद्र मोदींनी दिला आहे, तर खासदार प्रतापराव जाधव यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे संधी मिळाली आहे.
मुरलीधर मोहोळ हे पहिल्यांदाच पुण्यातून लोकसभा निवडणूक जिंकले आहेत. नवखे असूनही त्यांच्या सारख्या तरुण मराठा चेहर्‍याला भाजपाने संधी तर दिली आहेच पण पुण्यासारख्या महत्वाच्या शहरालाही केंद्रीय मंत्रिपदाचा मान दिला आहे.
सामाजिक समीकरणाचा विचार
नव्या मंत्रिमंडळात प्रतापराव जाधव आणि मुरलीधर मोहोळ हे दोन मराठा, रामदास आठवलेंच्या रूपाने दलित, रक्षा खडसे यांच्या रूपाने महिला व ओबीसी तर पियूष गोयल यांच्या रूपाने राज्यात भाजपसोबत असलेल्या गुजराती व व्यापारी वर्गाला प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यात लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपाने जिंकल्या आहेत. जळगाव हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. रक्षा खडसे यांना मंत्री करून एकनाथ खडसे यांनाही भाजपने बळ देण्याचा प्रयत्न केला आहे.
मेरिटच्या आधारावर मंत्रिपदाचा निर्णय घेतला : एकनाथ शिंदे
शिवसेनेकडून केंद्रात मंत्रिपदासाठी निवड करताना मेरिटचा आधार घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शिवसेनेतर्फे प्रतापराव जाधवांना संधी देण्यात आली आहे. ते पक्षातील ज्येष्ठ नेते असून चार वेळा खासदार आहेत. त्यांची निवड मेरिटच्या आधारे करण्यात आली आहे. प्रतापराव या संधीचे सोने करतील. विरोधकांनी सरकार कोसळण्याचे मुंगेरीलाल के हसीन सपन बघू नये, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
नितीन गडकरी : तिसर्‍यांदा मंंत्रिपदाची माळ
नागपूरमधून सलग दोन वेळा निवडून गेलेले आणि सलग दोनही वेळेत मंत्रिमंडळात स्थान पटकावलेले, तिसर्‍यांदा विजयी झाल्यावरही मंत्री झालेल्या नितीन गडकरी यांनी 1976 मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. 2005 मध्ये ते भाजपाचे प्रदेशाध्यक्षही होते. 2009-2013 पर्यंत ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. या पक्षाचे ते सर्वात तरुण अध्यक्ष होते.
रामदास आठवले : जुळवून घेण्याची वृत्ती
रिपब्लिकन पक्षाचे सर्वेसर्वा आणि एक खासदार या दोन्ही गोष्टी सोडल्या तरी रामदास आठवले यांच्याभोवती स्वत:चे असे एक वेगळे वलय आहे. लहानपणापासून जगण्यासाठीचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीत झोकून देऊन केलेले काम, राजकीय चातुर्य किंवा सगळ्यांशी जुळवून घेण्याच्या वृत्तीमुळे आठवले आजही महाराष्ट्राच्या राजकारणात आपले स्थान टिकवून आहेत.
मुरलीधर मोहोळ : बूथ कार्यकर्ता ते केंद्रीय राज्यमंत्री
भारतीय जनता पक्षाचा बूथ कार्यकर्ता, नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर असे राजकीय टप्पे पार करीत खासदार मुरलीधर मोहोळ यांनी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. वयाच्या अवघ्या 49 व्या वर्षी ते केंद्रीय राज्यमंत्री बनले आहेत. खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर मोहोळ यांनी खासदारपदासाठी तयारी केली अन् पक्षाने त्यांना संधी दिली.
पीयूष गोयल : वेगवेगळ्या खात्यांचा अनुभव
पियूष गोयल यांच्यावर लहानपणापासूनच भाजपचे संस्कार झाले होते. वडील वेदप्रकाश गोयल हे भाजपचे ज्येष्ठ नेते, खजिनदार होते व आई चंद्रकांता गोयल या आमदार होत्या. पियूष यांनीही तरुणपणापासूनच भाजपचे संघटनात्मक कार्य सुरू केले होते. गोयल यांनी कोळसा, ऊर्जा, रेल्वे, वाणिज्य, कॉर्पोरेट अफेअर्स अशा विविध खात्यांचा कार्यभार सांभाळलेला आहे.
प्रतापराव जाधव : आडत व्यापारी ते मंत्री!
सलग चौथ्यांदा बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून निवडून येण्याचा विक्रम करणारे खासदार प्रतापराव जाधव यांचा सरपंच, बाजार समितीमधील आडत व्यापारी ते केंद्रीय मंत्रीपदापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. जाधव यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1960 रोजी मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रूक या गावात झाला. त्यांनी बारावीपर्यंत मेहकर येथे शिक्षण पूर्ण केले.
रक्षा खडसे : सरपंच ते केंद्रीय मंत्री…
जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केलेल्या रक्षा निखिल खडसे यांचा हा प्रवास खडतर व अनेक आव्हाने पेलणारा आहे. पतीच्या निधनानंतर सासरे एकनाथ खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय धडे गिरवित सरपंच ते मंत्री पदापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. रक्षा खडसे यांचे बीएसी कॉम्प्युटरपर्यंत शिक्षण झाले आहे.