गडकरी, गोयल कॅबिनेट; मोहोळ, आठवले, खडसे राज्यमंत्री
नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा शपथविधी रविवारी राष्ट्रपती भवनातील शानदार समारंभात पार पडला. या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, पीयूष गोयल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ, रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले आणि शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा मात्र मंत्रिमंडळात समावेश झालेला नाही.
राष्ट्रपती मुर्मू यांनी पंतप्रधानांसह कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, जे. पी. नड्डा, शिवराज सिंह चौहान, निर्मला सीतारामन, एस. जयशंकर, मनोहरलाल खट्टर, पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, सर्वानंद सोनोवाल, डॉ. वीरेंद्र कुमार, प्रल्हाद जोशी, जुअल ओराम, गिरीराज सिंह, अश्विनी वैष्णव, ज्योतिरादित्य शिंदे, भूपेंद्र यादव, गजेंद्र सिंह शेखावत, अन्नपूर्णा देवी, हरदीपसिंग पुरी, डॉ. मनसुख मांडवीय, जी. किशन रेड्डी, सी. आर. पाटील या भाजप नेत्यांसह जीतनराम मांझी (हिंदुस्थान अवामी मोर्चा), राजीव रंजन सिंह (जनता दल संयुक्त), एच. डी. कुमारस्वामी (जनता दल धर्मनिरपेक्ष), राम मोहन नायडू (तेलगू देसम), चिराग पासवान (लोकजनशक्ती पक्ष, रामविलास) या घटक पक्षांतील नेत्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली.
राष्ट्रपती भवनात सायंकाळी 7.15 वाजता कार्यक्रम सुरू झाला. देशी-विदेशी पाहुण्यांमुळे राष्ट्रपती भवनाला वेगळीच झळाळी आली होती.
तत्पूर्वी मोदींनी सकाळी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. यानंतर ते अटलजींच्या समाधी स्थळावर आणि राष्ट्रीय युद्ध स्मारकावर गेले.
या राज्यांतून हे मंत्री
यूपीतून अपना दल (एस) प्रमुख अनुप्रिया पटेल, रालोद प्रमुख जयंत चौधरी, जतीन प्रसाद, बी. एल. वर्मा, पंकज चौधरी, एस. पी. सिंह बघेल, कमलेश पासवान यांचा; राजस्थानातून अर्जुनराम मेघवाल, गजेंद्र सिंह, भूपेंद्र यादव आणि भगीरथ चौधरी यांचा; छत्तीसगडमधून तोखान साहू यांचा, हरियाणातून माजी मुख्यमंत्री खट्टर, राव इंद्रजित, कृष्णपाल गुर्जर यांचा; तर पंजाबातून रवनीत बिट्टू यांचा समावेश आहे.
नेहरू आणि मोदी
* माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 62 वर्षांच्या जुन्या विक्रमाची बरोबरी मोदींनी रविवारी केली.
* नेहरू 1952, 1957 आणि 1962 मध्ये सलग तीनवेळा विजय मिळवून पंतप्रधान झाले होते. मोदी 2014, 2019 आणि 2024 मध्ये सलग तिसर्यांदा पंतप्रधान झाले आहेत.
मंत्रिमंडळात 27 ओबीसी,10 दलित, 5 आदिवासी समुदायातील मंत्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 72 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्रिमंडळात 27 ओबीसी, 10 अनुसूचित जातीतील तर 5 आदिवासी समुदायातील (एससी) खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
सात देशांच्या राष्ट्रप्रमुखांची उपस्थिती
मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुईज्जू, नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानील विक्रमसिंघे, बांगला देशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंदकुमार जगन्नाथ, भूतानचे राष्ट्रप्रमुख शेरिंग टोबगे, सेशलचे उपराष्ट्राध्यक्ष अहमद अफीफ आदी देशांचे राष्ट्रप्रमुख आणि प्रतिनिधी शपथविधी सोहळ्यास उपस्थित होते. भारत आणि मालदीवमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुईज्जू यांनी उपस्थिती लावल्याने या घटनेला राजनैतिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
स्मृती इराणी, राणे, दानवेसह 20 माजी मंत्र्यांचा पत्ता कट
मोदी-1 आणि मोदी-2 सरकारमध्ये मंत्रिपद भूषविलेल्या किमान 20 मंत्र्यांचा पत्ता मोदी-3 मंत्रिमंडळातून कट झाला आहे. या मंत्र्यांकडे महत्त्वाची खाती होती. एनडीए सरकारमधून मात्र त्यांना वगळण्यात आले आहे. यामध्ये स्मृती इराणी, नारायण राणे, कपील पाटील, रावसाहेब दानवे, साध्वी निरंजन जोती, व्ही. के. सिंग, राजीव चंद्रशेखर, अनुराग ठाकूर, आर. के. सिंह, मीनाक्षी लेखी आदींचा समावेश आहे.