कोल्हापूर: खिद्रापूर येथे अतिक्रमणाच्या निषेधार्थ रस्त्यावरच थाटले दुकान

कोल्हापूर: खिद्रापूर येथे अतिक्रमणाच्या निषेधार्थ रस्त्यावरच थाटले दुकान

कुरुंदवाड : Bharat Live News Media वृत्तसेवा : खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील कोपेश्वर मंदिरासमोर करण्यात आलेली अतिक्रमणे ग्रामपंचायत प्रशासन हटवत नसल्याच्या निषेधार्थ चक्क एका ग्रामस्थांनी आपल्या घरातील आणि दुकानाचे साहित्य भर रस्त्यावर मांडून रस्ताच अडवत व्यवसाय सुरू केला आहे. ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायतने 15 दिवसांच्या नोटीसाचे नाट्य करत अतिक्रमणाला बळ दिल्याचा आरोप ग्रामस्थ गणेश पाखरे यांनी केला आहे.
दरम्यान, प्राचीन पर्यटन स्थळ असलेल्या कोपेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ताच अडवल्याने भाविकांची गैरसोय झाली आहे. कोपेश्वर मंदिरासमोर मागील चार महिन्यांपासून अनेक हातगाडे आणि खोक्याचे अतिक्रमण झाल्याने मंदिराचा परिसर भकास झाला आहे. पर्यटक आणि ग्रामस्थांनी याबाबत तक्रारी केल्यानंतर ग्रामपंचायतीने पंधरा दिवसांच्या नोटीसा देऊन कागदी घोडे नाचवण्याचा आरोप आता ग्रामस्थांतून होऊ लागला आहे.
गणेश पाखरे यांनी घरासमोरील आणि मंदिरासमोरील अतिक्रमणे काढावीत, यासाठी ग्रामपंचायतीला वारंवार कळवले. तरीही अतिक्रमणे काढत नसल्याने आज चक्क पाखरे यांनी आपल्या दुकानाचे साहित्य आणि प्रापंचिक साहित्य भर रस्त्यावरच ठेवून व्यावसाय सुरू केला आहे. परगावाहून येणाऱ्या पर्यटकांना हा मोठा अडथळा ठरत आहे. या प्रकारामुळे अतिक्रमणाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अतिक्रमणे हटविणार की याला ग्रामपंचायत प्रशासन बळ देणार, असा सवाल आता ग्रामस्थांतून उपस्थित होत आहे. दरम्यान, याबाबत ग्रामसेवक रवींद्र वैरागी, सरपंच सारिका कदम यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
हेही वाचा 

कोल्हापूर, इचलकरंजी मनपामुळे विधानसभा निवडणुकीत चुरस
कोल्हापूर : कुरुंदवाड परिसरात गांजा विक्रीत वाढ; कारवाईकडे दुर्लक्ष
कोल्हापूर : कुरुंदवाड-भैरववाडी येथील दारू अड्डा म्हणजे गुन्हेगारी निर्मितीचे केंद्र