मान्सूनची गुड न्युज! मान्सून 31 मे रोजी केरळात; ‘ला निना’बाबत हवामान खात्याचा मोठा अंदाज

मान्सूनची गुड न्युज! मान्सून 31 मे रोजी केरळात; ‘ला निना’बाबत हवामान खात्याचा मोठा अंदाज

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये पोहोचणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. दरवर्षी 1 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होतो. परंतु, हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यंदा एक दिवस आधीच म्हणजेच 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो. बुधवारी (दि. 15) रात्री उशिरा हवामान खात्याने हा अंदाज व्यक्त केला. जाहीर केलेल्या तारखेत 4 दिवस कमी-जास्त होण्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली. म्हणजेच 28 मे ते 3 जूनदरम्यान कधीही मान्सून दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला.
केरळमध्ये मान्सून दाखल होण्याच्या अगोदर अंदमान आणि निकोबार बेटांवर पोहोचत असतो. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, अंदमान आणि निकोबार बेटांवरही मान्सून दोन दिवस अगोदर दाखल होण्याची शक्यता आहे. दरवर्षी 21 मे रोजी या बेटांवर मान्सून दाखल होतो. परंतु, हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदा 19 मे रोजी अंदमान-निकोबार बेटांवर मान्सून धडकण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षीही अंदमान आणि निकोबार बेटांवर 19 मे रोजी मान्सून दाखल झाला होता; मात्र केरळमध्ये 9 दिवस उशिराने 8 जूनला पोहोचला होता.
यावर्षी 106 टक्के पावसाची शक्यता
‘अल निनो’ आणि ‘ला निना’ असे दोन हवामान प्रकार आहेत. गेल्या वर्षी ‘अल निनो’ सक्रिय होता, तर या वेळी ‘अल निनो’ची परिस्थिती या आठवड्यात संपली असून, तीन ते पाच आठवड्यांत ‘ला निना’ची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी, ‘अल निनो’दरम्यान सामान्यपेक्षा कमी पाऊस झाला होता; तर यंदा ‘ला निना’मुळे चांगला पाऊस होण्याची अपेक्षा हवामान खात्याने व्यक्त केली आहे. यावर्षी 106 टक्के पाऊस पडू शकतो, असा अंदाज गेल्या महिन्यात हवामान खात्याने व्यक्त केला होता.
हेही वाचा

कोकणातील 7 जिल्ह्यांत 613 गावे दरडप्रवण!
मोदींचा आत्मविश्वास हरवला : शरद पवार
हैदराबाद प्ले-ऑफमध्ये; पावसामुळे गुजरातविरुद्धचा सामना रद्द