काळजी घ्या! तापमानातील बदलांमुळे फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाने उच्चांंक गाठल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच गेला आठवडाभर दुपारपर्यंत अंगाची लाही-लाही करणारे ऊन आणि त्यानंतर पाऊस असे अगम्य चढ-उतार पाहायला मिळत आहेत. बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होत असून नागरिकांमध्ये फ्लूसदृश तक्रारी वाढत आहेत. सध्या मोठ्या प्रमाणात ऋतूबदल होत असल्याने आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. हवामानात वेगाने होणार्या बदलांमुळे प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. विषाणूजन्य आजारांनी डोके वर काढले की तब्येतीच्या कुरबुरी सुरू होतात. यामध्ये सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी यांसह श्वसनाच्या आजारांचे प्रमाण लक्षणीयरित्या दिसून येत आहे.
अशा वेळी आहारावर, दैनंदिन वेळापत्रकावर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने थंड पेये, आंबा यावर ताव मारला जात आहे. मात्र, संध्याकाळच्या वेळी पावसामुळे थंड वातावरण निर्माण होत असून पचनावर परिणाम होत आहे. डायरिया म्हणजेच अतिसाराचे रुग्णही वाढत आहेत. दूषित पाण्यामुळे, अन्नामुळे उन्हाळ्यातही अतिसाराचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत आहे. शहरात गेल्या चार महिन्यांत तब्बल 2 हजार 341 डायरिया रुग्णांची नोंद झाली आहे.
बदललेले हवामान, लोकसंख्यावाढ, अस्वच्छता आदी कारणांमुळे शहरात साथरोगांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. जानेवारी ते एप्रिल या कालावधीत शहरात श्वसनरोग, इन्फ्लूएंझा याच्या 14 हजार 326 रुग्णांची नोंद झाली आहे. तर, तापाचे 7 हजार आणि डायरियाचेही 2341 रुग्ण आढळून आलेले आहेत. उन्हाळ्यातही साथरोगाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहेत, अशी माहिती महापालिकेच्या साथरोग विभागाचे प्रमुख डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली.
ओपीडीमध्ये सव्वादोन लाख रुग्णांची नोंद
महापालिकेच्या बाह्यरुग्ण विभागामध्ये चार महिन्यांत दोन लाख 24 हजार रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे महापालिकेंतर्गत 52 ओपीडी चालवल्या जातात. आता आरोग्यवर्धिनी केंद्रेही सुरू झाली आहेत. बाह्यरुग्ण विभागांमध्ये दररोज अडीच ते तीन हजार रुग्ण उपचार घेतात.
हेही वाचा
महापालिका कर्मचार्यांची दिवाळी! सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता मिळणार
नरेंद्र मोदी यांच्यासारखाच पंतप्रधान पाकिस्तानला हवा
कोकणातील 7 जिल्ह्यांत 613 गावे दरडप्रवण!