कोल्हापूर: यड्राव येथे भीषण अपघातात महिला ठार; १० जखमी 

कोल्हापूर: यड्राव येथे भीषण अपघातात महिला ठार; १० जखमी 

यड्राव : Bharat Live News Media वृत्तसेवा :  शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे तवेरा चारचाकी गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. तर १० जण जखमी झाले. ही घटना आज (दि.१३) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास घडली. लालबी कलबुर्गी (रा. संगमनगर, तारदाळ, ता. हातकणंगले) असे मृत महिलेचे नाव आहे. तारदाळ येथील संगमनगर मधील सनदी कुटुंबातील सर्व जखमी असल्याचे समजते. जखमींना सांगली सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. यामुळे मार्गावर तासभर वाहतूक ठप्प झाली होती.
तारदाळ येथील सनदी कुटुंबीय नांदणी येथील नातेवाईकांकडे जात होते. नाईक निंबाळकर सेवा सोसायटी समोरील ओढ्याजवळ तवेरा चार चाकी क्रमांक एम.एच.12 ई.एम.7422 या वाहनावरील चालकाचा दुसऱ्या वाहनाला चुकविताना ताबा सुटला. यामुळे चारचाकी तीन चार पलटी मारत रस्त्याकडेच्या ओघळीमध्ये पडली. या भीषण अपघातामुळे मोठा आवाज झाला. यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. लालबी यांचा शरीरातील रक्तस्त्राव अधिक झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर चार महिलांच्या डोक्याला, हाताला, पायाला, कमरेला मोठी दुखापत झाली आहे. तर यामध्ये पाच मुलेही जखमी झाले आहेत. त्यांच्याही डोक्याला, हाताला, पायाला, दुखापत झाली आहे. या सर्वांना रुग्णवाहिकेतून सांगली सिविल हॉस्पिटल येथे उपचारासाठी पाठवण्यात आले. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शहापूर पोलीस तब्बल पाऊण तासानंतर घटनास्थळी दाखल झाल्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत होता.
पोलिसांनी पंचनाम्यानंतर मृतदेह सेवविच्छेदनासाठी इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात पाठविला. घटनास्थळी नातेवाईकांनी गर्दी केली होती.यावेळी मृतदेह व जखमींना पाहून अनेकांनी हंबरडा फोडला. सनदी कुटुंबीय हे पूर्वी रेणुकानगर यड्राव येथे राहत असल्यामुळे या परिसरातील अनेक नागरिक त्याला ओळखत होते.  या घटनेमुळे उपस्थित नागरिकातून हळहळ व्यक्त होत होती.