मानसिक आरोग्यासाठी नृत्य उपयुक्त

मानसिक आरोग्यासाठी नृत्य उपयुक्त

नवी दिल्ली : भारतात अनेक नृत्य प्रकार आहेत. लावणी, भरतनाट्यम्, कथ्थक, कुचिपुडी, मणिपुरी, कथकली, ओडिसी, बॉलीवूड डान्स, वेस्टर्न डान्स, असे अनेक डान्सचे प्रकार आहेत. अनेक जण आवड म्हणून नृत्य करतात. पण, नृत्य करण्याचे अनेक फायदे देखील आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानसिक आरोग्यासाठी ते फायदेशीर आहे. धकाधकीच्या, ताणतणावाच्या जीवनात मानसिक ताणतणावापासून मुक्ती देऊन नृत्यकला मनाला आराम देते, असे तज्ज्ञ सांगतात. मानसिक आरोग्यासाठी नृत्याचे काही आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊ :
नृत्य केल्यामुळे शरीरात एंडोर्फिन सारखे आनंदी हार्मोन्स तयार होतात. ज्यामुळे चिंता, तणाव पासून मुक्ती मिळते आणि मूड फ्रेश राहतो. जर तुम्ही रोज काही वेळ डान्ससाठी देत असाल, तर धकाधकीच्या जीवनात निर्माण होणार्‍या चिंता आणि तणावापासून आराम मिळेल. कोणत्या गोष्टीमुळे निराश असाल, तर आवडीच्या गाण्यावर डान्स केल्यास मन हलकं होतं. तुम्ही कोणत्याही वयात डान्स करू शकता. आवड जपण्यासाठी आणि कायम आनंदी राहण्यासाठी वयाची गरज नसते.
काही बंधन आपणच आपल्यावर घालून घेत असतो. डान्स केल्यामुळे तुमच्यातील आत्मविश्वास देखील वाढतो. वेगवेगळ्या प्रकारच्या नृत्याचं तुम्ही प्रशिक्षण घेता. त्यानंतर चार लोकांमध्ये कौतुक झाल्यानंतर तुमच्यात असलेल्या विश्वास वाढतो. यामुळे तुम्हाला स्वतःला प्रचंड आनंद होतो. नातं कोणतंही असो, त्यामध्ये प्रेम आणि काळजी वाढण्यासाठी डोकं शातं आणि हेल्दी राहणं फार महत्त्वाचं असतं. डान्स केल्याने शरीरात आनंदी हार्मोन्स तयार होतात. ज्यामुळे उत्साह वाढतो. सतत होणारी चिडचिड देखील होत नाही. असं असल्यास इतरांनादेखील तुमच्यासोबत वेळ व्यतीत करायला आवडते.