सांगली, भिवंडीबाबत काँग्रेसचा आग्रह कायम

सांगली, भिवंडीबाबत काँग्रेसचा आग्रह कायम

मुंबई; Bharat Live News Media वृत्तसेवा : महाविकास आघाडीच्या जवळपास दीड दोन तास चाललेल्या बैठकीतही सांगली, भिवंडी, दक्षिण-मध्य मुंबई, सातारा या चार जागांचा तिढा सुटू शकला नाही. कोणत्याही तोडग्याशिवाय ही बैठक संपल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी माध्यमांशी बोलणे टाळले. त्यामुळे महाविकास आघाडीत काही जागांवर मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात, या चर्चेला पुन्हा बळ मिळू लागले आहे.
राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत जागा वाटपावर प्रामुख्याने चर्चा झाली. मात्र, आघाडीतील तिन्ही पक्ष आपापल्या भूमिकांवर ठाम राहिल्याने कोणताही तोडगा न काढताच बैठक गुंडाळावी लागली. त्यानंतर माध्यमांना वारंवार विनंती वा संपर्क करूनही या बैठकीतील नेत्यांनी माध्यमांशी बोलणे कटाक्षाने टाळले. त्यामुळे या बैठकीत काही गंभीर तर घडलेले नाही ना, अशीही चर्चा रंगली.
या बैठकीला शरद पवार यांच्यासह ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत, काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. सांगली आणि दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. भिवंडी मतदारसंघासाठी शरद पवार गट आग्रही आहे. कोणत्याही परिस्थितीत सांगली आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून माघार घेणार नाही अशी ठाम भूमिका ठाकरे गटाकडून या बैठकीत घेण्यात आली. भिवंडी आणि सातारा मतदारसंघाबाबतही राष्ट्रवादीने आपली भूमिका कायम ठेवल्याने या चारपैकी एकही मतदारसंघ काँग्रेसला सुटलेला नाही.
विश्वजित कदम भूमिकेवर ठाम
मुंबई : सांगली लोकसभेच्या जागेसाठी आमदार विश्वजित कदम यांच्यासह सांगली जिल्हा काँग्रेस आक्रमक आहे. तसेच जोपर्यंत सांगली लोकसभेच्या जागेचा तिढा सुटत नाही, तोपर्यंत राज्य प्रचार समिती आणि पक्षाच्या बैठकीवर आपला बहिष्कार असेल, असे पत्र विश्वजित कदम यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पाठवले आहे. कदम यांनी बुधवारी झालेल्या प्रचार समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला.
Latest Marathi News सांगली, भिवंडीबाबत काँग्रेसचा आग्रह कायम Brought to You By : Bharat Live News Media.