शेवाळे-देसाई यांच्यात ईर्ष्येचा सामना

दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून राज्यसभेचे माजी खासदार अनिल देसाई यांचे नाव घोषित केले आहे. त्यानंतर अवघ्या काही तासांतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे या मतदार संघात आता शिवसैनिक असलेल्या माजी खासदारांमध्ये थेट लढत होणार आहे. मुख्यमंत्री … The post शेवाळे-देसाई यांच्यात ईर्ष्येचा सामना appeared first on पुढारी.

शेवाळे-देसाई यांच्यात ईर्ष्येचा सामना

राजेश सावंत

दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून राज्यसभेचे माजी खासदार अनिल देसाई यांचे नाव घोषित केले आहे. त्यानंतर अवघ्या काही तासांतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे या मतदार संघात आता शिवसैनिक असलेल्या माजी खासदारांमध्ये थेट लढत होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारण्यापूर्वी राहुल शेवाळे व ठाकरे यांच्यामध्ये फारसे आलबेल नव्हते. शेवाळे यांनी अनेकदा अप्रत्यक्षरीत्या उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंबद्दल नाराजी व्यक्त केली होती. उद्धव ठाकरे यांनी भाजपला बाजूला करून सत्तेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर केलेली आघाडी शेवाळे यांना पसंत नव्हती. याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे शेवाळे यांच्यावर ठाकरे कुटुंब नाराज होते. या नाराजीमुळे शिवसेना-भाजप युती असती तरी शेवाळे यांचा पत्ता कापला जाणार होता.
दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर 40 आमदारांसोबत खासदार राहुल शेवाळेही शिंदे गटात दाखल झाले. एवढेच नाही तर अन्य खासदारांना शिंदे गटात आणण्याची महत्त्वाची भूमिका शेवाळे यांनी बजावली होती. त्यामुळे शिंदेनी शेवाळे यांची लोकसभेमध्ये गटनेतेपदी नियुक्ती केली. त्यामुळे दक्षिण मध्य मुंबईतून शेवाळे यांना शिवसेनेतून उमेदवारी मिळणार, हे निश्चित होते. परंतु ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर न केल्यामुळे शिंदे यांनीही शेवाळे यांचे नाव जाहीर केले नाही. मात्र, दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाने माजी खासदार अनिल देसाई यांचे नाव घोषित करताच शिंदे यांनी आपल्या पहिल्या यादीत शेवाळे यांचे नाव घोषित केले.
शेवाळे यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्यामुळे ठाकरे सेनेच्या शिवसैनिकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. त्यात स्वतः उद्धव ठाकरे नाराज असल्यामुळे शेवाळे यांना खासदारकीपासून दूर ठेवण्यासाठी ठाकरे गटात रणनीती आखली जात आहे. ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या या मतदार संघाची जबाबदारी आदित्य ठाकरे व मुंबईतील विद्यमान आमदार यांच्यावर सोपवण्यात येत आहे. या मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघांत ठाकरे गटाचे विद्यमान आमदार, नेते 24 तास कार्यरत राहावेत व कोणताही दगाफटका बसू नये, यासाठी स्वतः उद्धव ठाकरे लक्ष ठेवून राहणार आहेत. माजी नगरसेवकांवरही त्या त्या प्रभागातील जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या मतदार संघात येणार्‍या माहीम विधानसभेतील आमदार सदा सरवणकर शिंदे गटात आहेत. त्यामुळे दादर शिवाजी पार्क हा संपूर्ण परिसर ठाकरे गटाने पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.
माहीम विधानसभेत ठाकरे गटाला सर्वाधिक मते मिळाली, तर सरवणकर यांच्यासाठी मोठा धोका ठरेल. 2009 मध्ये झालेल्या विधानसभेमध्ये सरवणकर यांनी काँग्रेसमधून निवडणूक लढवली होती. त्यामुळे शिवसेनेने येथून आदेश बांदेकर यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत बांदेकर व सरवणकरांना पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी मनसेचे नितीन सरदेसाई आमदार म्हणून निवडून आले. 2014 व 2019 मध्ये सरवणकर यांनी पुन्हा शिवसेनेमधून निवडणूक लढवल्यामुळे दोन्ही वेळी ते निवडून आले. मात्र, आता येथील शिवसैनिक सरवणकर यांच्यावर नाराज आहेत. तर हा विधानसभा मतदारसंघ सुरुवातीपासून ठाकरेंचा बालेकिल्ला असल्यामुळे येथून शेवाळे यांना मतासाठी संघर्ष करावा लागण्याची चिन्हे आहेत.
धारावी विधानसभेतही काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आमदार असल्यामुळे येथेही महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान होण्याची शक्यता आहे. वडाळा विधानसभेमध्ये भाजपचे कालिदास कोळंबकर आमदार असले तरी येथे ठाकरे गटाला मानणारी मराठी कुटुंबे मोठ्या प्रमाणात आहेत. सायन कोळीवाडा विधानसभेमध्ये भाजप आमदार असून येथे शेवाळे यांचे मताधिक्य वाढू शकते. चेम्बूर येथे ठाकरे गटाचे आमदार असल्यामुळे येथे शेवाळे यांना आव्हान आहे. अणुशक्तीनगरमध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नवाब मलिक यांचा दबदबा असल्यामुळे येथे महायुतीचा उमेदवार म्हणून शेवाळे यांना फायदेशीर ठरू शकतो. विशेष म्हणजे सलग दहा वर्षे शेवाळे खासदार आहेत. त्यापूर्वी ते अणुशक्तीनगर या भागातील नगरसेवकही होते. त्यामुळे त्यांचा मतदारांशी वैयक्तिक संपर्क आहे. याचा फायदाही त्यांना होऊ शकतो.
देसाई यांना निवडणुकीचा पहिला अनुभव!
ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई राज्यसभेचे सदस्य राहिले असले तरी, त्यांचा निवडणूक लढवण्याचा पहिलाच अनुभव आहे. त्यामुळे त्यांना सर्वस्वी पक्षावरच अवलंबून राहावे लागणार आहे. विशेष म्हणजे लोकसभा मतदार संघातील पदाधिकारी कसे काम करणार, यावर देसाई यांचे भवितव्य अवलंबून आहे. पण ठाकरे कुटुंबीयांच्या खास मर्जीतील असलेले देसाई यांच्या मागे स्वतः उद्धव ठाकरेच नाही, तर रश्मी ठाकरे व आदित्य ठाकरेही भक्कमपणे उभे राहिले आहेत.
काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग
दक्षिण मध्य मुंबईत काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत या मतदार संघातून काँग्रेसचे दिवंगत नेते एकनाथ गायकवाड निवडून आले होते. गायकवाड यांना एकूण मतदानाच्या 43 टक्के मते मिळाली होती. 2014 व 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत गायकवाड यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. पण या निवडणुकीत गायकवाड यांनी अनुक्रमे 32 व 34 टक्के मते घेतली होती.
मनसे, वंचितकडे मोठा मतदार
या मतदार संघात मनसे व वंचित बहुजन आघाडीकडेही मोठा मतदार आहे. दादर, शिवाजी पार्क, माहीम आदी परिसरात मनसेचा जोर आहे; तर धारावीमध्ये वंचितचे मतदार आहेत. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत वंचितने येथून 63 हजार मते घेतली होती. तर 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत मनसेने सुमारे 73 हजार मते
घेतली होती.
2019 चे मतदान
राहुल शेवाळे (शिवसेना)- 4,24,913
एकनाथ गायकवाड (काँग्रेस) 2,72,774
संजय भोसले (वंचित) – 63,412
एकूण मतदान : 7 लाख 97 हजार 903
नोटा : 13 हजार 834
Latest Marathi News शेवाळे-देसाई यांच्यात ईर्ष्येचा सामना Brought to You By : Bharat Live News Media.