गोविंदा पुन्हा राजकीय आखाड्यात

गोविंदा पुन्हा राजकीय आखाड्यात

रशीद किडवाई

रजतपट गाजविल्यानंतर अभिनेता गोविंदा आहुजा हा पुन्हा एकदा राजकीय मैदानात उतरला आहे. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने तिकीट दिले असून तो पुन्हा बाजी मारणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मिलिंद देवरा यांचे वडील आणि काँगे्रसचे दिवंगत माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांच्यामुळे त्याचा राजकारणातील प्रवेश सुकर झाला. काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले मिलिंद देवरा आणि गोविंदा हे सध्या शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत, हा योगायोग म्हटला पाहिजे. काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर सोनिया गांधी यांच्या सन्मानार्थ 1998 मध्ये मुरली देवरा यांनी मेजवानीचे आयोजन केले होते. यशस्वी अभिनेता असलेल्या गोविंदालाही या मेजवानीचे आमंत्रण देण्यात आले होते. त्यावेळी देवरा हे पत्नी हेमासह गोविंदाला थेट सोनिया गांधी बसलेल्या टेबलावर घेऊन गेले. तेथे त्यांनी गोविंदाची ओळख सोनिया यांच्याशी करून दिली. त्यावर सोनिया म्हणाल्या, मी गोविंदा यांना ओळखते. त्यावेळी गोविंदा तिथेच बसला होता. त्याच्या साधेपणाने आणि प्रांजळ वागण्याने सोनिया प्रभावित झाल्याचे दिसून आले. त्यांनी त्याला दिल्लीत असताना 10 जनपथला भेट देण्याचे निमंत्रण दिले होते. गोविंदाने असे सांगितले होते की, नेहरू-गांधी कुटुंबाबद्दल मला आदर आहे. म्हणूनच मी काँग्रेसची निवड केली आहे. दरम्यान, काही काळ लोटल्यानंतर 2004 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबईतून गोविंदाने भाजपचे दिग्गज नेते माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांच्या विरुद्ध नेत्रदीपक विजय मिळवला, तेव्हा त्याला जायंट किलरचा किताब मिळाला होता. तथापि, 2008 पर्यंत गोविंदाचा भ्रमनिरास झाला. राजकारण हे आपले क्षेत्र नसल्याचे त्याला कळून चुकले. त्याने राजकारण सोडण्याचे ठरवले. 2009 च्या निवडणुकीत तर त्याने काँग्रेसचा प्रचारही केला नाही. मात्र, पक्षाचे उमेदवार संजय निरुपम यांनी विजय मिळवला.
गोविंदाचा काँग्रेसच्या विचारसरणीशी किंवा सामाजिक कार्यक्रमांशी फारसा संबंध नव्हता. तसेच लोकसभेच्या बहुतांश अधिवेशनांना तो उपस्थित राहिला नव्हता. संसदेच्या सर्व अधिवेशनांपैकी केवळ 12 टक्केच हजेरी त्याने लावली. आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्याने संसदेत एकही भाषण केले नाही आणि आपल्या मतदार संघातील समस्या मांडल्या नाहीत. त्यामुळे काँग्रेससाठी ही बाब लाजिरवाणी ठरली.
‘विरार का छोकरा’चे आकर्षण
राजकीय पॅकेज म्हणून गोविंदा एक सरप्राईज होता. प्रचाराच्या अथक फेर्‍यांदरम्यान तो उत्साही दिसायचा. आपल्या अभिनयाद्वारे त्याने प्रचंड चाहते मिळवले होते. अनेकदा त्याने आपण कसे हजरजबाबी आहोत, हेही दाखवून दिले होते. मतदारांनाही ‘विरार का छोकरा’चे आकर्षण होते. सामान्य कुटुंबातून जन्म घेऊनही त्याने हे यश संपादन केले होते. हीच त्याची सर्वात मोठी ताकद होती. मुंबईत स्थायिक झालेल्या मूळच्या पंजाबी कुटुंबात त्याचा जन्म झाला होता. त्याची आई, निर्मला देवी शास्त्रीय गायिका होत्या. तसेच त्याचे वडील अरुण आहुजा चित्रपट अभिनेते होते. त्यांची तब्येत बिघडली, तेव्हा कुटुंबाला त्यांचा कार्टर रोडचा बंगला सोडून विरारला जावे लागले. तिथेच गोविंदाचा जन्म झाला. सहा मुलांपैकी तो सर्वात धाकटा. त्याचे लाडके नाव आहे ची ची. याचा अर्थ भगवान कृष्णाची करंगळी.
वडील आजारी असल्याने, आई निर्मला देवी यांनी या आपल्या मुलांचे धैर्याने पालनपोषण केले. मात्र, गोविंदाने यावर मात करून स्वतःला घडविले. 2017 मध्ये हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत गोविंदा म्हणाला होता, मला सांगायला अभिमान वाटतो की, सध्या मी जिथे आहे तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी मला कोणाच्या नाकदुर्‍या काढाव्या लागल्या नाहीत. मला चित्रनगरीत शीर्षस्थानी राहायचे होते आणि मी ते माझ्या पद्धतीने साध्यही केले. यानंतर मला राजकारणात उतरायचे होते. तेही मी करून दाखविले. आता पुन्हा एकदा तो राजकारणातील नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे. त्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी हातमिळवणी केल्यानंतर खरा गोविंदा कोणता, हे ठरवणे कठीण होत चालले आहे.

Latest Marathi News गोविंदा पुन्हा राजकीय आखाड्यात Brought to You By : Bharat Live News Media.