माजी सैनिकासह इतरांना गंडा घालणाऱ्यास गोव्यातून अटक, नेपाळमध्ये पळण्याचा होता बेत
नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा ४ टक्के परतावा देण्याचे आमीष दाखवून माजी सैनिकासह त्यांच्या मित्रांना १ कोटी ३८ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या संशयितास गुंडा विरोधी पथकाने गोव्यातून पकडले आहे. युवराज बाळकृष्ण पाटील (४२, रा. बेळगाव, कर्नाटक) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ७ मोबाइल, पासपोर्ट असा १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
माजी सैनिक संजय बिन्नर (रा. भगूर) यांची कर्नाटक मधील संशयित युवराज पाटील व राहुल शंकर गौडा पाटील याच्यासोबत ओळख झाली होती. त्यावेळी युवराज याने मार्च २०२० मध्ये अॅक्युमेन व गुडविल कंपनींचे प्रमाणपत्र दाखवून ब्रोकर असल्याचे सांगितले. तसेच या कंपन्यांमार्फत आर्थिक गुंतवणूक केल्यास दरमहा ४ टक्के परतावा मिळेल असे आमीष दाखवले. त्यानुसार बिन्नर यांच्यासह त्यांच्या ओळखीच्या ११ जणांनी युवराजकडे १ कोटी ३८ लाख ५० हजार रुपये गुंतवले. युवराजने ऑगस्ट २०२० पर्यंत गुंतवणूकदारांना ठरल्याप्रमाणे परतावा दिला. मात्र क्रिप्टो करन्सीत पैसे अडकले असून काही दिवसांनी परतावा देतो असे सांगत युवराजने पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर त्याने संपर्क तोडला. त्यामुळे बिन्नर यांनी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात २०२३ मध्ये युवराज व राहुल विरोधात फसवणूकीसह महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे सरंक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. आर्थिक गुन्हे शाखा या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. दरम्यान, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, गुंडा विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, अंमलदार विजय सुर्यवंशी, प्रदिप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे यांनी तपास करीत गोवा राज्यात संशयिताचा शोध घेतला. युवराज हा पणजीमध्ये त्याच्या मित्राच्या फ्लॅटवर राहत असल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचून त्यास पकडले. त्याचा ताबा आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवला आहे.
नेपाळमध्ये पळण्याचा बेत
पोलिसांच्या प्राथमिक तपासात युवराज व राहुल यांनी याप्रकारे इतरांनाही गंडा घातल्याचे समोर येत आहे. फसवणूकीतील पैसे कॅसिनोत जुगार खेळण्यासाठी वापरल्याचा संशय आहे. युवराज हा काही दिवसांनी नेपाळमध्ये पळून जाणार असल्याचे चौकशीत उघड झाले. युवराज यास मंगळवारी(दि.२) न्यायालयात हजर केले जाणार आहे.
हेही वाचा :
Baramati Lok Sabha election : बारामतीत निवडणूक कर्तव्यात कसूर; विस्तार अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
Dhule Lok Sabha 2024 | ‘वंचित’कडून धुळ्यात माजी आयपीएस अधिकारी अब्दुर्र रहमान यांना उमेदवारी, भाजपसमोर आव्हान
Latest Marathi News माजी सैनिकासह इतरांना गंडा घालणाऱ्यास गोव्यातून अटक, नेपाळमध्ये पळण्याचा होता बेत Brought to You By : Bharat Live News Media.