पाकिस्तानच्या नौदल हवाई तळावर हल्ला
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील तुर्बत आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नौदल हवाई तळावर सोमवारी (दि.२५) रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला. हवाई तळावर काही काळ गोळीबार आणि बॉम्बस्फोट झाला. पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी प्रत्युत्तराच्या गोळीबारात पाच हल्लेखोरांना ठार केले. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
दहशतवाद्यांनी तुर्बत आंतरराष्ट्रीय विमानतळ (TUK) आणि पाकिस्तानचे दुसरे सर्वात मोठे नौदल हवाई स्टेशन पीएनएस सिद्दिकीवर हल्ला केला. दोन्ही ठिकाणी जोरदार गोळीबार आणि स्फोट घडवले. द बलुचिस्तान पोस्टचा हवाला देत एएनआयने म्हटले आहे की, तुर्बतमधील पाकिस्तानच्या दुसऱ्या क्रमांकाच्या नौदल हवाई स्टेशन पीएनएस सिद्दीकवर दहशतवादी हल्ला झाला. या परिसरात अनेक स्फोटही झाल्याची माहिती आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी तुर्बतच्या रुग्णालयांमध्ये सर्व डॉक्टरांना तातडीने कर्तव्यावर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
या हल्ल्यात सिद्दीक विमानतळाचे कोणतेही नुकसान झालेले नाही. दहशतवाद्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना लगेच ओळखून सुरक्षा दलांनी ठार केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, या घटनेवर पाकिस्तानी लष्कराने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
ग्वादर बंदरावर २० मार्चला झाला होता हल्ला
यापूर्वी २० मार्च रोजी बीएलएच्या मजीद ब्रिगेडने बलुचिस्तानमधील ग्वादर बंदर प्राधिकरण संकुलात दहशतवादी हल्ला केला होता. ज्यामध्ये दोन पाकिस्तानी सैनिक आणि आठ दहशतवादी मारले गेले होते. पाकिस्तानी लष्कराने एका निवेदनात म्हटले होते की, आठ दहशतवाद्यांनी बंदर प्राधिकरण संकुलात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु सुरक्षा दलांनी हा हल्ला हाणून पाडला.
चीनच्या भागीदारीत बांधलेले ग्वादर बंदर चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) साठी महत्त्वाचे आहे. यामध्ये अब्जावधी डॉलर्सच्या रस्ते आणि ऊर्जा प्रकल्पांचा समावेश आहे. हा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI) चा देखील एक भाग आहे.
हेही वाचा :
मॉस्को हल्ल्यामागे कट्टरपंथी इस्लामवादीच;पण ‘आदेश’ कोणाचा हे तपासणार : पुतिन
‘युद्ध’ थांबवा म्हणताच इस्रायलने अमेरिकेवरच डोळे वटारले!
‘गाझामध्ये युद्धविराम करा’, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत ठराव मंजूर
Latest Marathi News पाकिस्तानच्या नौदल हवाई तळावर हल्ला Brought to You By : Bharat Live News Media.