खबरदार! फेक न्यूज शेअर कराल तर पडेल महागात, सोशल मीडियावर पोलिसांचा ‘वॉच’

खबरदार! फेक न्यूज शेअर कराल तर पडेल महागात, सोशल मीडियावर पोलिसांचा ‘वॉच’

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा– आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर राजकीय पक्ष, उमेदवार किंवा नेत्यांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर पोलिसांची नजर राहणार आहे. त्याचप्रमाणे चुकीच्या बातम्या किंवा माहिती पसरवणाऱ्यांवरही पोलिस कारवाई करणार आहेत. यासाठी पोलिसांसह जिल्हाधिकारी कार्यालयाची भरारी पथके तयार करण्यात येणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जाहिरातींसह प्रचारांवर सर्वांचा भर राहतो. बदलत्या कालौघात पारंपारिक प्रचार यंत्रणेसोबत सोशल मीडियाचा वापर सर्वाधिक वाढला आहे. सर्वांपर्यंत कमी वेळेत, कमी खर्चात आपले म्हणणे, विचार पोहचवता येत असल्याने राजकीय पक्षांसह लोकप्रतिनिधींकडून सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर होत आहे. त्याचप्रमाणे राजकीय पक्षाचे समर्थकही सोशल मीडियाचा वापर प्रभावीपणे करत आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूकीत छाप पाडून विजय मिळवण्यासाठी सर्वांकडून सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यावर सर्वाधिक भर राहणार आहे. दरम्यान, या माध्यमांमार्फत खोटी, चुकीची किंवा आक्षेपार्ह माहिती पसरवण्याचाही सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेलाही बाधा निर्माण होऊ शकते. एखादा लोकप्रतिनिधी किंवा राजकीय पक्षांची प्रतिमा मलीन होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे मतदार राजाचीही दिशाभूल होऊ शकते. त्यामुळे पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. सायबर पोलिसांकडूनही सतर्क राहून सोशल मिडियाच्या विविध माध्यमांवर ‘वॉच’ ठेवला जात आहे. तसेच ‘फेक न्यूज’ ओळखून ती व्हायरल करणाऱ्यांवरही पोलिसांचे लक्ष आहे.
तक्रार कोठे करावी?
कुठल्याही प्रकारे आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचे लक्षात येताच जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक कक्षाच्या टोल-फ्री हेल्पलाइन १९५० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच शहर पोलिस आयुक्तालयाच्या ९९२३३२३३११ या व्हॉट्सॲप हेल्पलाइन क्रमांकावर सुद्धा तक्रार देऊ शकतात.
सोशल मीडिया सेल
पोलिस दलाकडून साेशल मीडिया सेल कार्यान्वित करण्यात आला आहे. या सेलमार्फत सायबर पेट्रोलिंग केले जाते. सोशल मीडियावर कुठल्या प्रकारचे ‘ट्रेण्डस्’ सुरू आहेत, याची या सेलमार्फत माहिती घेत त्याची पडताळणी देखील केली जाते. निवडणूक काळात सायबर पेट्रोलिंगमध्ये वाढ केली जाणार आहे. कुठल्याही प्रकारची आक्षेपार्ह पोस्ट, कोणत्याही स्वरूपात आढळून आल्यास संबंधिताविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
हेही वाचा –

नाशिकच्या जागेवरून राज्याचे राजकारण तापले, इच्छुकांची वारी शिंदे- फडणवीसांच्या दारी
मायग्रेनच्या त्रासासाठी केली तपासणी; मेंदूत आढळला जंत!
Automotive Design : करिअर ऑटोमोटिव्ह डिझाईनमधलं..!

Latest Marathi News खबरदार! फेक न्यूज शेअर कराल तर पडेल महागात, सोशल मीडियावर पोलिसांचा ‘वॉच’ Brought to You By : Bharat Live News Media.