ओलमणी येथील अंगणवाडी इमारत धोकादायक
इमारतीला गळती लागल्याने बालकांच्या जीविताला धोका : अंगणवाडीच्या स्थलांतराचे आदेश : पण, पर्यायी जागा नसल्याने समस्या
वार्ताहर /जांबोटी
ओलमणी येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक दोनची इमारत बालकांसाठी धोकादायक बनली आहे. इमारतीला मोठ्या प्रमाणात गळती लागल्यामुळे अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या बालकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अंगणवाडी इमारतीसाठी त्वरित निधी मंजूर करावा, अशी मागणी होत आहे. ओलमणी गावासाठी दोन अंगणवाडी केंद्र कार्यान्वित आहेत. दोन्ही अंगणवाडीसाठी दोन स्वतंत्र इमारती आहेत. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी अंगणवाडी केंद्र क्रमांक दोनसाठी जिल्हा पंचायतमधून निधी मंजूर केला होता. या अंतर्गत हरिजन गल्ली नजीक असलेल्या जलानयन कार्यालयाच्या आवारात अंगणवाडी इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र कंत्राटदाराने अंगणवाडी बांधकामाचे बिल अदा केले नसल्यामुळे अंगणवाडी इमारतीचे बांधकाम अर्धवट सोडून दिल्यामुळे, ग्रामपंचायतीने सदर इमारत अद्याप ताब्यात घेतली नाही. त्यामुळे अंगणवाडी बालकासाठी पर्यावी व्यवस्था म्हणून अंगणवाडी केंद्राचे कामकाज गेल्या कित्येक वर्षापासून जलानयन कार्यालयाच्या इमारतीतच सुरू आहे. मात्र सदर कार्यालय इमारतीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने जलानयन कार्यालयाच्या इमारतीची देखील दुर्दशा झाली आहे. या इमारतीच्या छताला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. खिडक्याची तावदाने फुटल्याने तसेच भिंतीमधून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी झिरपत असल्यामुळे या अंगणवाडीला सध्या डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ओलमणी अंगणवाडी केंद्र क्र. दोनमध्ये एकूण 30 बालके शिक्षण घेतात. मात्र अंगणवाडीसाठी पर्यावी व्यवस्था नसल्यामुळे बालकांना पाण्यात बसून शिक्षण घ्यावे लागत असल्याने बालकांच्या आरोग्य व जीविताला धोका निर्माण झाला आहे.
आहाराचेही नुकसान
वास्तविक पाहता लहान मुलांना बालवयात शिक्षणाची गोडी लागावी व सकस आहाराचा पुरवठा व्हावा या उद्देशाने सरकारमार्फत लाखो रुपये खर्च करण्यात येतात. मात्र इमारतीअभावी ओलमणी अंगणवाडी केंद्र क्र. दोनमधील बालके त्यापासून वंचित राहिली आहेत. कारण अंगणवाडीत लागलेल्या गळतीमुळे बालकासाठी असलेला सकस आहार व अन्नधान्याची देखील पाण्यामुळे नासाडी होत असल्यामुळे बालके देखील त्यापासून वंचित राहिली आहेत.
अंगणवाडीच्या स्थलांतराचे आदेश
धोकादायक बनलेल्या इमारतीबाबत पालक व नागरिकांनी खानापूर महिला व बालकल्याण खात्याच्या अधिकाऱ्याकडे तक्रार केल्यानंतर खानापूर तालुका सीडीपीओ अधिकारी सुखाते यांनी मागील वर्षी ओलमणी गावाला भेट देऊन अंगणवाडी इमारतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी संभाव्य धोका टाळण्यासाठी अंगणवाडीचे त्वरित स्थलांतर करावे व या ठिकाणी बालकांना न बसविण्याचा आदेश संबंधित अंगणवाडी शिक्षिका व साहाय्यिकाना दिला. त्याची दखल घेऊन मागीलवर्षी सदर अंगणवाडी केंद्र भाड्याच्या घरात सुरू केले होते. परंतु यावर्षी घर मालकाने अंगणवाडीला जागा देण्यास नकार दिल्याने तसेच पर्यावी जागा उपलब्ध नसल्याने नाईलाजात्सव जलानयन खात्याच्या इमारतीतच सुरू करण्यात आल्यामुळे या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या बालकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. तरी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून अंगणवाडीसाठी पर्यायी जागा द्यावी व इमारतीच्या बांधकामासाठी त्वरित निधी मंजूर करावा, अशी मागणी होत आहे.
Home महत्वाची बातमी ओलमणी येथील अंगणवाडी इमारत धोकादायक
ओलमणी येथील अंगणवाडी इमारत धोकादायक
इमारतीला गळती लागल्याने बालकांच्या जीविताला धोका : अंगणवाडीच्या स्थलांतराचे आदेश : पण, पर्यायी जागा नसल्याने समस्या वार्ताहर /जांबोटी ओलमणी येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक दोनची इमारत बालकांसाठी धोकादायक बनली आहे. इमारतीला मोठ्या प्रमाणात गळती लागल्यामुळे अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या बालकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अंगणवाडी इमारतीसाठी त्वरित निधी मंजूर करावा, अशी मागणी होत आहे. ओलमणी […]