नदाल नंतर जोकोविचचे आव्हान समाप्त

नदाल नंतर जोकोविचचे आव्हान समाप्त

वृत्तसंस्था/ रोम
एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरु असलेल्या इटालियन खुल्या पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुरूष एकेरीमध्ये धक्कादायक निकाल पहिल्या फेरीपासूनच पहावयास मिळत आहे. स्पेनचा माजी टॉप सिडेड राफेल नदालला पराभव पत्करावा लागल्यानंतर सर्बियाचा टॉप सिडेड जोकोविचला तिसऱ्या फेरीतील सामन्यात अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. 29 वर्षीय अॅलेजेंड्रो टॅबिलोने जोकोविचला पराभवाचा धक्का देत पुढील फेरीत स्थान मिळवले.
या स्पर्धेत शुक्रवारी जोकोव्हिचने पहिल्या फेरीतील सामना जिंकल्यानंतर आपल्या चाहत्यांना स्वाक्षरी देत असताना एका अज्ञात व्यक्तीकडून फेकण्यात आलेली पाण्याची बटली जोकोविचच्या डोक्यावर आदळली. पण आपल्याला कोणतीही गंभीर इजा झाली नसल्याचे जोकोविचने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
पुरूष एकेरीच्या तिसऱ्या फेरीतील सामन्यात 29 व्या मानांकित अॅलेजेंड्रो टॅबिलोने जोकोविचचा केवळ 68 मिनिटांच्या कालावधीत 6-2, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभवाचा धक्का देत पुढील फेरी गाठली. या स्पर्धेच्या इतिहासातील जोकोविचचा हा सर्वात मोठा पराभव म्हणावा लागेल. स्पेनच्या माजी टॉप सिडेड राफेल नदालला गेल्या शनिवारी हुबर्ट हुरकेजने 6-1, 6-3 असा पराभव केला होता. जोकोविचला हरवणारा तेबिलोचा पुढील फेरीतील सामना कॅचेनोव्हशी होणार आहे. कॅचेनोव्हने तिसऱ्या फेरीतील सामन्यात सेरुनडोलोचा 6-2, 6-4, जर्मनीच्या तृतीय मानांकित व्हेरेव्हने इटलीच्या लुसियानो डेरडेरीचा 7-6 (7-3), 6-2, अमेरिकेचा टेलर फ्रिजने सेबेस्टियन कोर्दाचा 6-3, 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. डिमिट्रोव्ह आणि माँटेरो यांनीही पुरूष विभागात पुढील फेरी गाठली आहे.
महिलांच्या विभागात द्वितीय मानांकित साबालेंकाने चौथ्या फेरीत प्रवेश मिळविताना डाएना येस्ट्रीमेस्काचा 6-4, 6-2, अमेरिकेच्या सोफिया किननला अमेरिकेच्या डॅनिली कॉलिन्सकडून पराभव पत्करावा लागला. अमेरिकेच्या कॉलिन्सने कॅरोलिन गार्सियाचा 6-3, 6-3 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.