चौथ्या टप्प्यातही 65 टक्क्यांवर मतदान

सतराशेहून अधिक उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद : 96 जागांसाठी मतदान  ► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी 10 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या 96 मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी 5 वाजेपर्यंत 62.31 टक्के मतदान झाले. सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरू राहिल्यामुळे अंतिम टक्केवारी 65 च्या वर पोहोचण्याचा अंदाज […]

चौथ्या टप्प्यातही 65 टक्क्यांवर मतदान

सतराशेहून अधिक उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद : 96 जागांसाठी मतदान 
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी 10 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या 96 मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी 5 वाजेपर्यंत 62.31 टक्के मतदान झाले. सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरू राहिल्यामुळे अंतिम टक्केवारी 65 च्या वर पोहोचण्याचा अंदाज आहे. निवडणूक आयोगाकडून येत्या एक-दोन दिवसात अंतिम टक्केवारी जाहीर होऊ शकते.
चौथ्या टप्प्यात 96 जागांसाठी सतराशेहून अधिक उमेदवार रिंगणात असून त्यांचे राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. आतापर्यंतच्या निवडणूक प्रक्रियेनुसार लोकसभेच्या 543 जागांपैकी 380 जागांवर मतदान पूर्ण झाले. उर्वरित तीन टप्प्यात 163 जागांवर मतदान होणार आहे. सोमवारी झालेल्या मतदानावेळी आंध्रप्रदेश आणि पश्चिम बंगालच्या काही भागात हिंसाचाराच्या घटना घडल्या. आंध्रप्रदेशमध्ये टीडीपी आणि वायएसआरसीपीच्या नेत्यांमध्ये हाणामारीची घटना निदर्शनास आली. येथे 175 विधानसभा आणि 25 लोकसभा मतदारसंघांसाठी एकाचवेळी मतदान पार पडले. याशिवाय ओडिशामध्येही 28 विधानसभा जागांवरही मतदान झाले.
जम्मू काश्मीरमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सर्वात कमी मतदानाची टक्केवारी नोंदवली गेली. श्रीनगर मतदारसंघात केवळ 35.75 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. श्रीनगरमधील ह्यावेळी कमी मतदान झाले असले तरी मागील निवडणुकीच्या तुलनेत टक्केवारी वाढल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 75.66 टक्के मतदान झाले. इतर राज्यांपैकी आंध्रप्रदेशात 68.04 टक्के, बिहारमध्ये 54.14 टक्के, झारखंडमध्ये 63.14 टक्के, मध्यप्रदेशात 68.01 टक्के, महाराष्ट्रात 52.49 टक्के, ओडिशामध्ये 62.96 टक्के, तेलंगणामध्ये 61.16 टक्के आणि उत्तर प्रदेशात 61.16 टक्के मतदान झाले आहे.
तेलंगणातील हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार के माधवी लता यांच्यावर एक व्हिडिओ क्लिप ऑनलाईन समोर आल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. सदर व्हिडिओमध्ये त्या बुरखा घातलेल्या महिला मतदारांना फोटो ओळखपत्रांशी तुलना करण्यासाठी त्यांचे चेहरे दाखवण्यास सांगताना दिसत आहेत.
आंध्रमध्ये जोरदार फ्री-स्टाईल
आंध्रप्रदेशातील गुंटूर येथील वायएसआर काँग्रेसचे आमदार अण्णाबथुनी शिवकुमार यांनी एका बूथवर एका मतदाराला थप्पड मारली. त्याला प्रत्युत्तर म्हणून मतदारानेही थप्पड मारली. यानंतर आमदार समर्थकांनी त्या व्यक्तीला मारहाण केली. रांगेत न आल्याने त्या व्यक्तीने आमदाराला अडवल्यामुळे वाद झाल्याचे सांगण्यात आले. तसेच आंध्रातच मतदारांशी गैरवर्तनाचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. झहीराबादचे काँग्रेसचे उमेदवार सुरेश शेटकर यांचा भाऊ नागेश शेटकर याने एका मतदाराला लाथ मारली. दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. यानंतर मतदाराची दुचाकी टाकून तो उचलण्यासाठी गेला असता शेटकर यांनी त्याला लाथ मारल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.
ओडिशात अनेक ईव्हीएममध्ये बिघाड
ओडिशात ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचा आणि कार्यकर्त्यांना बूथमध्ये जाण्यापासून रोखल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाला प्राप्त झाल्या आहेत.  बिघाडाच्या तक्रारीनंतर 65 बॅलेट युनिट, 83 कंट्रोल युनिट आणि 110 व्हीव्हीपॅट बदलण्यात आले आहेत. सकाळी सात वाजता प्रत्यक्ष मतदानापूर्वी सरावाच्या वेळी बहुतांश युनिट बदलण्यात आले. तसेच कर्तव्यात कसूर केल्याबद्दल आयोगाने ओडिशातील दोन मतदान अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.
मतदानादरम्यान 3 जणांचा मृत्यू
निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगाल, बिहार आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या कारणांमुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमधील बोलपूरमध्ये मतदानाच्या एक दिवस आधी एका टीएमसी कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. टीएमसीने बॉम्बस्फोटांचा आरोप सीपीआय (एम) समर्थकांवर केला आहे. दुर्गापूरमध्ये भाजप आणि टीएमसी समर्थकांमध्ये हाणामारी झाली आहे. बिहारमधील मुंगेरमध्ये मतदानापूर्वी एका पोलिंग एजंटचा हृदयविकाराच्या झटक्मयाने मृत्यू झाला. मुंगेरमध्येच मतदानादरम्यान स्लिप न दिल्याने काही लोकांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली. पोलिसांनी लाठीचार्ज करून दोन तऊणांना ताब्यात घेतले. महाराष्ट्रातील बीडमध्ये एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराचा हृदयविकाराच्या झटक्मयाने मृत्यू झाला आहे.