अकोळनजीक अपघातात युवक ठार

अकोळनजीक अपघातात युवक ठार

पिकअप वाहनाची झाडाला धडक : मृत युवक कोरोची-इचलकरंजीचा : एकजण जखमी
वार्ताहर /अकोळ
गोव्याहून निपाणी-अकोळमार्गे कोरोची इचलकरंजीकडे निघालेल्या (एमएच 09 एफएल 1169) या पिकअप वाहनाने रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या झाडाला जोराची धडक दिली. या अपघातात वाहन चालक आदिनाथ अनिल बाईत (वय 20, रा. कोरोची-इचलकरंजी) याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा सहकारी दीपक गाताडे (वय 27) हा जखमी झाला. सदर घटना गावापासून काही अंतरावर असणाऱ्या अकोळ हायस्कूल बसथांब्याजवळ घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, होळी सणानिमित्त गोवा येथे आयोजित कार्यक्रमासाठी डॉल्बी साहित्य घेऊन सदर वाहनचालक शनिवारी रवाना झाला होता. दोन दिवसाचा कार्यक्रम उरकून गावी जात असताना हा भीषण अपघात झाला. रस्त्याच्या विरुद्ध बाजूस असणाऱ्या झाडास दिलेली धडक चालकाला झोपेची गुंगी आल्याने झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. घटनेची माहिती समजताच निपाणीचे सीपीआय बी. एस. तळवार यांच्या मार्गदर्शनाखाली विजय पाटील, रमेश तळवार, हवालदार हिरेमठ, जी. एन. वडराळे, होमगार्ड आवटे आदी घटनास्थळी दाखल झाले. संबंधित अधिकाऱ्यांनी अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून संबंधितांना बोलावून घेतले. अपघाताचे भीषण दृश्य पाहून आदिनाथच्या नातलगांनी घटनास्थळी आक्रोश केला. या मार्गावर नागरिकांसह रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची प्रचंड रीघ लागली होती. उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी काही काळासाठी एक मार्ग वाहतुकीसाठी खुला केला होता.