मच्छे-वाघवडे येथील रस्ता दुरुस्तीला वाली कोण?

रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य : प्रशासनाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष : वाहतुकीसाठी रस्ता बनला धोकादायक वार्ताहर /किणये मच्छे ते वाघवडे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. प्रशासनाचे या रस्त्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी वाहनधारक व स्थानिक नागरिकांतून होत आहेत. रस्त्यावरील खड्यांमुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला […]

मच्छे-वाघवडे येथील रस्ता दुरुस्तीला वाली कोण?

रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य : प्रशासनाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष : वाहतुकीसाठी रस्ता बनला धोकादायक
वार्ताहर /किणये
मच्छे ते वाघवडे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. प्रशासनाचे या रस्त्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी वाहनधारक व स्थानिक नागरिकांतून होत आहेत. रस्त्यावरील खड्यांमुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. या रस्त्यासाठी आम्ही दाद मागायची कुणाकडे असा सवाल सर्वसामान्य नागरिकांतून उपस्थित करण्यात येऊ लागला आहे. या रस्त्याला वाली कोण? अशा तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत. मच्छे व वाघवडे रस्त्याच्या आजूबाजूला विविध प्रकारचे औद्योगिक कारखाने आहेत. या रस्त्यावरून स्थानिक वाहनधारकांबरोबर कारखान्यांना जाणाऱ्या कामगार वर्गांचीही वर्दळ असते. औद्योगिक वसाहतीजवळच्या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे.
दुचाकी चालविणे मुश्कील
औद्योगिक वसाहतीनजीकच्या रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. ही खेदाची बाब आहे. मच्छे, वाघवडे, संतिबस्तवाड या भागातील वाहनधारकांची या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. सध्या रस्त्याची परिस्थिती पाहता दुचाकी चालविणेही मुश्कील बनले आहे. अशी माहिती नागरिकांनी दिली. रात्रीच्यावेळी या रस्त्यावरून कामगार वर्गाला ये-जा करावी लागते. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच रस्त्याचे कामकाज सुरू करण्याची गरज आहे.
खड्डेमय रस्त्यामुळे बैलगाडी झाली आडवी
मच्छे ते वाघवडे रस्ता पूर्णपणे खड्डेमय बनला आहे. सध्या या भागात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरील खड्यांमध्ये साचलेले आहे. मच्छे हावळनगर चौथ्या क्रॉसजवळचा रस्ता अतिशय खराब झाला आहे. खड्यांमुळे तीन दिवसांपूर्वी रस्त्यावर बैलगाडी पडली होती. मच्छे गावातील बिर्जे हे शेतकरी भातपेरणी करण्यासाठी रस्त्यावरून शिवाराकडे जात होते. मात्र मोठ्या खड्यांमुळे बैलगाडी पडली. त्यामुळे बैलगाडीचे नुकसान झाले आहे. अशा अनेक अपघाताच्या घटना या रस्त्यावर घडत आहेत. तरीही प्रशासनाला जाग येत नाही.
– गजानन छप्रे, मच्छे
रस्ता दुरुस्तीचा केवळ दिखावा
वाघवडे गावाला सोमवारी सकाळी मी पत्नीसह दोघे दुचाकीवरून मच्छे येथून जात होतो. खड्यांळे आमची दुचाकी घसरून पडली आणि किरकोळ दुखापत झाली. रस्त्यावर इतके खड्डे पडलेले आहेत की, या रस्त्यावरून ये-जा करणे अवघड बनलेले आहे. गेल्या पंधरा दिवसापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. मात्र दुरूस्तीचा केवळ दिखावा करण्यात आला आहे. मच्छेपासून हावळनगरपर्यंत एक दोन टिप्पर खडीमाती टाकण्यात आली. मात्र मच्छे ते वाघवडे या संपर्क रस्त्याची पूर्णपणे दुरूस्ती करण्यात आली नाही. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी करून याची त्वरित दुरुस्ती करावी.
– भरत आपटेकर, पिरनवाडी