जिल्ह्यात 111 गावांना टँकरने पाणीपुरवठा

जिल्ह्यातील 12 तालुक्यांमध्ये पाण्याची समस्या : पाणीपुरवठ्यासाठी 168 टँकरचा वापर बेळगाव : लोकसभा निवडणुकांची धूळवड संपल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील 100 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असून सदर गावांना कूपनलिकांद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर 111 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांकडून उपलब्ध […]

जिल्ह्यात 111 गावांना टँकरने पाणीपुरवठा

जिल्ह्यातील 12 तालुक्यांमध्ये पाण्याची समस्या : पाणीपुरवठ्यासाठी 168 टँकरचा वापर
बेळगाव : लोकसभा निवडणुकांची धूळवड संपल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील 100 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असून सदर गावांना कूपनलिकांद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर 111 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे. पावसाचे प्रमाण घटल्यामुळे यंदा अनेक तलाव कोरडे पडले आहेत. तर अनेक गावांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील 12 तालुक्यांमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून संबंधित गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी अधिकाऱ्यांना यापूर्वीच सूचना केल्या आहेत. यासाठी गावपातळीवर असणाऱ्या कूपनलिका ताब्यात घेऊन संबंधित कूपनलिका मालकांशी करार करून पाणीपुरवठा करण्याची सूचना केली होती. त्यानुसार 100 गावांना गावातीलच खासगी व ग्राम पंचायतीच्या कूपनलिकांद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर 8 तालुक्यांमधील 111 गावांना गंभीर पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. अशा गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. 168 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अथणी तालुक्यातील सर्वाधिक 49 गावांना गंभीर पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. रायबाग तालुक्यातील 28 गावे, चिकोडी तालुक्यातील 14, हुक्केरी व खानापूर तालुक्यातील प्रत्येकी 3, बेळगाव तालुक्यातील 2 आणि मुडलगी तालुक्यातील 6 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
34 कूपनलिकांद्वारे पाणीपुरवठा
ज्या गावांमध्ये सरकारी कूपनलिका आहेत मात्र पाणी नाही, अशा गावांमध्ये खासगी कूपनलिकांद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यासाठी ग्रा. पं. पातळीवर ग्राम विकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कूपनलिका मालकांशी करार करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 8 तालुक्यांमध्ये 34 खासगी कूपनलिकांच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अशाप्रकारे जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील गावांमध्ये निर्माण झालेल्या पाणी समस्येवर तोडगा काढून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, हा पाणीपुरवठाही नागरिकांसाठी दिलासादायक ठरत नसल्याने दमदार वळिवाची प्रतीक्षा केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी बेळगाव, खानापूर तालुक्यासह चिकोडी तालुक्यातील काही भागात वळिवाने दमदार हजेरी लावली आहे. इतर तालुक्यांमध्ये अशाप्रकारे दमदार पावसाची गरज असून प्रशासनालाही पावसाची प्रतीक्षा लागून आहे.
पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध
पाणी समस्या असलेल्या गावांची माहिती घेण्यात आली असून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडे आवश्यक निधी उपलब्ध असून पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरांचे बिलही वेळेत अदा केले जात आहे. कोणत्याच भागात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, याची दखल घेतली जात आहे.
– जिल्हाधिकारी, नितेश पाटील