शहर परिसरात पुन्हा वळीव बरसला

शहर परिसरात पुन्हा वळीव बरसला

व्यापारी व खरेदी करणाऱ्या नागरिकांची तारांबळ : सर्वत्र पाणीच पाणी
बेळगाव : एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा मंगळवारी शहरासह उपनगरामध्ये जोरदार पाऊस झाला. मंगळवारी सायंकाळी 7 वाजता आलेल्या पावसामुळे साऱ्यांचीच तारांबळ उडाली. ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले. त्यामुळे बाजारपेठेतील फेरीवाले, बैठे व्यापारी यांची एकच धावपळ तारांबळ उडाली. दुचाकीस्वार व पादचाऱ्यांनाही आडोसा शोधावा लागला. दोन दिवसांपूर्वी वळिवाने शहरासह उपनगर व ग्रामीण भागाला अक्षरश: झोडपून काढले. या पावसामुळे साऱ्यांचीच दाणादाण उडाली होती. त्यानंतर सोमवारी पावसाने विश्रांती घेतली. मंगळवारी दुपारपासून उष्म्यामध्ये वाढ झाल्याचे जाणवत होते. पाऊस पडेल, अशी अपेक्षा होती. त्यानुसार सायंकाळी पावसाने हजेरी लावली. तब्बल तासभर पाऊस पडला. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. सायंकाळी या पावसाला सुरूवात झाली. त्यावेळी सारेजण घरी जाण्याच्या तयारीत होते. त्यांना भिजतच घर गाठावे लागले. पादचाऱ्यांनाही खरेदी करताना भिजतच खरेदी करावी लागली. विजेचा कडकडाट होत असल्यामुळे अनेकांना आडोसा शोधून त्या ठिकाणीच थांबावे लागले. या पावसामुळे गटारी तुडुंब भरुन वाहत होत्या. काही ठिकाणी रस्त्यावरुनही पाणी वाहत होते. त्यामधून वाट काढताना साऱ्यांनाच कसरत करावी लागत होती.
दोन तास वाहतूक कोंडी
मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या सर्व्हिस रस्त्यावर पाणी साचले. बुडा कार्यालयाच्या समोरच हे पाणी साचले. यामुळे कणबर्गी रस्ता तसेच बुडा कार्यालय आणि अशोक सर्कल (किल्ला) रस्त्यावर व सर्व्हिस रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली. यामुळे एकच गोंधळ उडाला. एक तर ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळत होता. यातच तब्बल दोन तास ही वाहतूक कोंडी झाल्याने वाहनालकांची तारांबळ उडाली. या प्रकारामुळे संताप व्यक्त करण्यात येत होता. सर्व्हिस रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने वाहन चालकांना त्याचा अंदाजच येत नव्हता. त्यामुळे वाहने पुढे नेणे अवघड झाले. रस्त्यावर पाणी आणि जोरदार पाऊस यामुळे वाहन चालकांना समोरचे काहीच दिसत नव्हते. रात्रीचा वेळ असल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली होती. रहदारी पोलीसही नसल्याने आणखीनच गंभीर परिस्थिती उद्भवली होती. या वाहतूक कोंडीमुळे महिला, लहान मुले व वृद्धांचे अतोनात हाल झाले.
बाळेकुंद्री भागात जोरदार पाऊस
बाळेकुंद्री, मोदगा, सुळेभावी, हुदली व हन्नीकेरी भागात  मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास अर्धातासाहून अधिक जोरदार पाऊस कोसळला. शिवारात सर्वत्र पाणीच पाणी झाले.  पावसामुळे शिवारातील भाजी पिकांचे नुकसान झाले. पेरणीपूर्वी मशागतीला हा पाऊस उपयुक्त  होणार आहे.
हिंडलगा परिसरात पाऊस
मंगळवार संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान पावसाला सुऊवात झाली.  या पावसामुळे शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. हिंडलगा येथील बेळगाव- वेंगुर्ला या मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. आंबेवाडी, सुळगा, विजयनगर, लक्ष्मीनगर या भागात पावसाने हजेरी लावली. या परिसरात जवळ जवळ अर्धा तास पाऊस कोसळला.