सकाळी घामाच्या धारा तर रात्री पावसाचा शिडकावा

सकाळी घामाच्या धारा तर रात्री पावसाचा शिडकावा

दुपारी पारा 36 डि.से.च्यावर : रात्री पडलेल्या पावसामुळे वातावरणात थोडा गारवा
पणजी : पारा 36 डि.से.च्याही पुढे पोहोचला आणि मंगळवारी सायंकाळी उशिरा संपूर्ण गोव्यात जोरदार पाऊस पडला. आजही पारा 36 डि.से. एवढा राहील मात्र ही उष्णतेची लाट नसल्याचे स्पष्टीकरण हवामान खात्याने दिले आहे. गोव्याच्या जनतेला प्रखर उन्हाळ्dयाचे चटके मंगळवारी बसले. हवामान खात्यामध्ये पारा 36 डि.से.च्या पुढे असा नोंद केला गेला. प्रत्यक्षात मात्र बाहेर सर्वत्र 38 डि.से.च्याही पुढे गेलेल्या तापमानाचे चटके नागरिकांना बसले व पंख्यातून उष्ण वारे पसरल्याने पंखे देखील कुचकामी बनू लागले. प्रखर उन्हाळ्dयामुळे अंगाची लाही लाही होत असतानाच नागरिक पावसाची प्रतीक्षा करीत होते. सायंकाळी 6.30 वा. नंतर गोव्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडला. पणजीत मात्र हलक्याच पद्धतीने पावसाच्या सरी पडून गेल्या. सांखळी, वाळपई व सत्तरीच्या अनेक भागात सायंकाळी पावसाने हजेरी लावली. उत्तर गोव्यात जुने गोवे, पणजी, दक्षिण गोव्यात धारबांदोडा, फोंडा, माशेल, सावर्डे, वेर्णा, वास्को आदी भागात जोरदारपणे पावसाच्या सरी कोसळल्या व हवामानात थोडा गारवा आला आणि जनतेला दिलासा मिळाला. हवामान खात्याने आजही गोव्यातील तापमान 36 डि.से.पर्यंत वाढण्याचा अंदाज  व्यक्त केला आहे. त्याचबरोबर आजही काही भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.