खानापूर, नंदगडात सुवासिनींनी घातले वडाला साकडे
वार्ताहर /नंदगड
जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून खानापूर, नंदगडसह तालुक्यातील गावोगावच्या महिलांनी आपापल्या परिसरातील वडाची मनोभावे पूजा करत व झाडाला फेरे घालत साकडेही घातले. त्यामुळे दिवसभर वडाच्या झाडाच्या परिसरात महिलावर्गाची गर्दी दिसून येत होती. वटपौर्णिमा शुक्रवारी असल्याने दोन दिवसांपासून खानापूर, नंदगड, बिडी, जांबोटी, लोंढा, पारिश्वाड बाजारात महिलांची गर्दी दिसून येत होती. या महिलांकडून पूजेसाठी लागणारी फळे, नारळ, दोरा व अन्य साहित्य खरेदी केले गेले.
शुक्रवारी सकाळपासूनच खानापूर शहरातील महिला आपल्या घरातील कामे आटोपून डोक्यावर पूजेचे साहित्य घेऊन नटून, थटून, गटागटांनी सतीमाता मंदिरकडे येत होत्या. दुपारी बाराच्या दरम्यान मोठ्याप्रमाणात गर्दी झाली होती. सती माता मंदिरासमोर मंडप घालण्यात आला होता. यावर्षी पाऊस नसल्याने महिलांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. या ठिकाणी उपस्थित महिलांनी सती देवी मंदिरात पूजन केले. त्यानंतर बाजूलाच असलेल्या वडाच्या झाडाला सात फेरे घातले. खानापूर शहरात आज दिवसभर वटपौर्णिमेच्या निमित्ताने महिला पूजेसाठी बाहेर पडल्याने एका मोठ्या सणाचे वैभव प्राप्त झाले होते.
नंदगड-चापगाव परिसरात वटपौर्णिमा साजरी
नंदगड येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी वडाच्या झाडाचे पूजन करून वटपौर्णिमा साजरी केली. रायपूर येथील क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या समाधीसमोर रस्त्याच्या बाजूला असलेल्या वडाच्या झाडाची पूजा महिलांनी केली. यावेळी नंदगडसह कसबा नंदगड येथील महिला हजर होत्या. चापगाव येथील फोंडेश्वर मंदिरापाठीमागील बाजूस वडाचे मोठे झाड आहे. या वडाच्या झाडाची पूजा चापगाव गावातील महिलांनी केली. लालवाडी-चापगाव रस्त्यावरील शिवोली गावाजवळ असलेल्या वडाच्या झाडाची पूजा शिवोली गावातील महिलांनी केली. बेकवाडच्या वेशीत सर्वांना सावली देणारे भव्य असे वडाचे झाड आहे. झाडासभोवती सिमेंट काँक्रीटचा कट्टा घालण्यात आला आहे. या झाडाची पूजा बेकवाड गावातील महिलांनी केली. त्यामुळे या परिसरात सर्वत्र महिलांचीच गर्दी दिसून येत होती.
बिडी- करंबळ-हलशी गावातील महिलांकडून मनोभावे पूजा
बिडी गावातील बिर्जे गल्लीतील हनुमान मंदिरासमोर असलेल्या वडाच्या झाडाची गावातील महिलांनी प्रतिवर्षाप्रमाणे पूजा करून सात फेरे घातले. खानापूर-तालगुप्पा राज्य मार्गावरील करंबळ वेशीलगत असलेल्या वडाच्या झाडाची करंबळ गावातील महिलांनी पूजा केली. नंदगड-हलशी रस्त्यावरील हलशी जवळील व्यासतीर्थ मंदिराजवळ तसेच भांबार्डा रस्ता क्रॉसजवळ असलेल्या वडाच्या झाडाची पूजा हलशी गावातील महिलांनी केली.
Home महत्वाची बातमी खानापूर, नंदगडात सुवासिनींनी घातले वडाला साकडे
खानापूर, नंदगडात सुवासिनींनी घातले वडाला साकडे
वार्ताहर /नंदगड जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून खानापूर, नंदगडसह तालुक्यातील गावोगावच्या महिलांनी आपापल्या परिसरातील वडाची मनोभावे पूजा करत व झाडाला फेरे घालत साकडेही घातले. त्यामुळे दिवसभर वडाच्या झाडाच्या परिसरात महिलावर्गाची गर्दी दिसून येत होती. वटपौर्णिमा शुक्रवारी असल्याने दोन दिवसांपासून खानापूर, नंदगड, बिडी, जांबोटी, लोंढा, पारिश्वाड बाजारात महिलांची गर्दी दिसून येत होती. या महिलांकडून पूजेसाठी लागणारी फळे, […]