सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यविधी करणे कठीण

सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यविधी करणे कठीण

दुरुस्तीसाठी काढलेले शेडवरील पत्रे अद्याप न बसविल्याने समस्या : शेडची तातडीने उभारणी करा
बेळगाव : सदाशिवनगर येथील स्मशानभूमीतील असलेल्या शेडची दुरुस्ती करण्यासाठी शेडवरील पत्रे काढण्यात आले आहेत. मात्र आता अंत्यविधी करताना समस्या निर्माण झाली असून तातडीने ते काम पूर्ण करावे, अशी मागणी जोर धरत आहे. सदाशिवनगर स्मशानभूमीत गंभीर परिस्थिती असताना शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये यावर कोणतीच चर्चा झाली नाही. यामुळे आता शहरवासियांतून नाराजी व्यक्त होत आहे.
सदाशिवनगर येथील स्मशानभूमीमध्ये असलेल्या शेडची दुरुस्ती करण्यासाठी काही महिन्यापूर्वी शेडवरील पत्रे काढण्यात आले आहेत. आता पाऊस सुरू झाल्याने त्याठिकाणी अंत्यविधी करणे अशक्य झाले आहे. पूर्वी असलेल्या लहान शेडमध्ये अंत्यविधी करण्यात येत आहे. मात्र एकाचवेळी पाच ते सहा मृतदेहांवर अंत्यविधी करणे कठीण झाले आहे. जागा लहान असल्यामुळे अडचण निर्माण होत असून अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईक व कुटुंबीय तसेच मित्रमंडळींना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
अंत्यविधी करण्यास जागाच नाही
या जागेमध्ये अंत्यविधी केल्यानंतर त्याठिकाणी दुसऱ्या मृतदेहावर अंत्यविधी करणे कठीण जात आहे. आग जोराने पेटत असल्यामुळे त्या परिसरात थांबून राहणेही धोक्याचे झाले आहे. गुरुवारी पाच मृतदेहांवर अंत्यविधी करण्यात आले होते. त्यामुळे त्याठिकाणी सहाव्या मृतदेहावर अंत्यविधी करण्यासाठी जागाच शिल्लक नव्हती. तसेच अंत्यविधीनंतर तीन ते चार दिवसांनी रक्षाविसर्जन केले जाते. त्या काळात इतर मृतदेहांवर त्याठिकाणी अंत्यसंस्कार करणे कठीण जात आहे. रक्षाविसर्जन झाल्याशिवाय जागा मिळत नाही. परिणामी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे कठीण जात आहे. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करावा आणि तातडीने शेडची उभारणी करावी, अशी मागणी होत आहे.
महापालिका लक्ष देण्यास तयार नाही
सदाशिवनगर येथील स्मशानभूमीमध्ये इतकी गंभीर परिस्थिती असताना महापौर, उपमहापौर आणि नगरसेवक हे लक्ष देण्यास तयार नाहीत, असा आरोप जनतेतून होत आहे.
दु:ख बाजूला ठेवून मृताच्या कुटुंबीयावर लाकडे रचण्याची वेळ
सातत्याने आवाज उठवून व महानगरपालिकेला निवेदन देऊनसुद्धा स्मशानभूमी येथे शेड उभारण्याबाबत उदासीनता दाखविण्यात आल्याने मृतदेहाची मात्र विटंबना होत आहे. शुक्रवारी संध्याकाळी तीन मृतदेह स्मशानभूमीत आणण्यात आले. परंतु शेड नाही आणि लाकडेही रचलेली नाहीत. त्या परिस्थितीत दु:ख बाजूला ठेवून मृतांच्या कुटुंबीयांवर लाकडे रचण्याची वेळ आली. याबद्दल नागरिकांनी व मृतदेह आणलेल्या कुटुंबीयांनी मनपाच्या नावे शिमगा केला. मृतदेहाची अशी परवड केली जाऊ नये, अशी भावना व्यक्त होत आहेत.