त्यांनी गमावला आहे आत्मविश्वास

त्यांनी गमावला आहे आत्मविश्वास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा आत्मविश्वास गमावला आहे. ते त्यांच्या प्रचार भाषणांमध्ये अनेक चुका करीत आहेत. आपली सत्ता जाणार याची त्यांना कल्पना आलेली आहे. या लोकसभा निवडणुकीत सत्तापरिवर्तन होणार हे आता निश्चित झाले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींना चिंता वाटत आहे, असा दावा समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी पत्रकार परिषदेत केला.
ज्यांनी या निवडणुकीत 400 पारचा नारा दिला होता, त्यांचा पराभव होणार आहे. या देशातील मतदार भारतीय जनता पक्षावर संतापले आहेत. या देशातील 140 कोटी लोक भारतीय जनता पक्षाला यंदा 140 जागाही देणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने उद्योगपतींची 25 लाख कोटी रुपयांची कर्जे माफ केली आहेत. मात्र, आमचे आश्वासन शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्याचे आहे. तसेच आम्ही शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत दर लागू करणार आहोत, असे प्रतिपादन त्यांनी रविवारी उत्तर प्रदेशातील बलिया येथे केले.
प्रचार सभेत भाषण
उत्तर प्रदेशातील सालेमपूर मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे उमेदवार राम शंकर विद्यार्थी यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत अखिलेश यादव यांनी भाषण केले. समाजवादी पक्ष या लोकसभा निवडणुकीनंतर देशाच्या राजकारणात महत्वाची भूमिका स्वीकारणार आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले.