‘डिजिटल अरेस्ट’चा प्रकार मुळातच बेकार!

ऑनलाईन चौकशी अस्तित्वात नसते : सायबर गुन्हेगारांना खंबीरपणे प्रत्युत्तर द्या : पोलीस दलातर्फे गुन्हेगारीच्या नव्या प्रकाराविषयी जागृती अडीच महिन्यांपूर्वीच तरुण भारतने नागरिकांना सतर्क केले होते. रमेश हिरेमठ /बेळगाव सायबर गुन्हेगारीचा नवा अवतार ‘डिजिटल अरेस्ट’ आता ठळक चर्चेत आला आहे. बेळगाव शहर व जिल्ह्यात आठवड्यातून एक-दोन सावज सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत आहेत. गेल्या आठवड्यात गोकाक येथील […]

‘डिजिटल अरेस्ट’चा प्रकार मुळातच बेकार!

ऑनलाईन चौकशी अस्तित्वात नसते : सायबर गुन्हेगारांना खंबीरपणे प्रत्युत्तर द्या : पोलीस दलातर्फे गुन्हेगारीच्या नव्या प्रकाराविषयी जागृती

अडीच महिन्यांपूर्वीच भारत लाईव्ह न्यूज मीडियाने नागरिकांना सतर्क केले होते.
रमेश हिरेमठ /बेळगाव
सायबर गुन्हेगारीचा नवा अवतार ‘डिजिटल अरेस्ट’ आता ठळक चर्चेत आला आहे. बेळगाव शहर व जिल्ह्यात आठवड्यातून एक-दोन सावज सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत आहेत. गेल्या आठवड्यात गोकाक येथील एका व्यक्तीने डिजिटल अरेस्टमधून बाहेर पडण्यासाठी सायबर गुन्हेगारांच्या बँक खात्यावर तब्बल 40 लाख रुपये जमा केले आहेत. सावजांना ठकवून किंवा काही प्रकरणात त्यांना घाबरवून त्यांची आर्थिक लूट करण्यासाठी सायबर गुन्हेगार रोज नवनवीन क्लृप्त्या लढवत असतात. सध्या केवळ बेळगावच नव्हे तर देशभरात डिजिटल अरेस्ट हा प्रकार ठळक चर्चेत आला आहे. एखाद्या व्यक्तीचा पिच्छा पुरविण्यास गुन्हेगारांनी सुरुवात केली तर त्याची लूट केल्याशिवाय ते थांबत नाहीत.
बेळगाव शहर व जिल्ह्यात आठवड्यातून एक-दोन प्रकार घडत आहेत. या नव्या प्रकारामुळे पोलीस दलाची डोकेदुखीही वाढली आहे. राज्यात डिजिटल अरेस्टच्या घटना वाढल्या आहेत. पोलीस दलाच्यावतीने डिजिटल अरेस्ट या गुन्हेगारीच्या नव्या प्रकाराविषयी जागृती केली जात आहे. कारण, सायबर गुन्हेगार सावजाला लुटण्यासाठी पोलीस, कस्टम्स, अँटी नॉर्कोटिक्स आदी विभागातील अधिकारी असल्याचे सांगत फसवणूक केली जात आहे. उत्तरप्रदेश, झारखंड, बिहारमध्ये बसून गुन्हेगार शेकडो किलोमीटरच्या अंतरावरील सावजाला ठकवत आहेत. काही वेळा एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती जमवून तर आणखी वेळा सर्वसाधारण कॉल करून ठकविण्यात येते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपण कस्टम्स किंवा पोलीस अधिकारी असल्याचे सांगत सावजांकडून लाखो रुपये उकळण्यात येत आहेत. केवळ फोन कॉलवरूनच नव्हे तर आता फसवणुकीसाठी ई-मेलचाही आधार घेतला जात आहे. डॉक्टर, अभियंते, उद्योजकांना टार्गेट केले जात आहे. एखाद्या डॉक्टरांना एक मेल येतो, ‘तुम्ही गुन्हेगारी प्रकरणात अडकला आहात. तुमची चौकशी करायची आहे. यासाठी न्यायालयाचा आदेशही आहे’, असा त्यामध्ये मजकूर असतो. एखाद्या न्यायालयाच्या आदेशाप्रमाणेच त्यातला मजकूर असतो. त्यामुळे साहजिकच सावज घाबरते.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मते डिजिटल अरेस्ट हा प्रकारच मुळात भंपक आहे. कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणाच्या तपासात ऑनलाईन चौकशी केली जात नाही. त्यामुळे सायबर गुन्हेगारांकडून जर डिजिटल अरेस्टसाठी प्रयत्न झाला तर धाडसाने त्यांना सडेतोड उत्तरे द्या. तुम्ही कोठून बोलत आहात? तुमचे कार्यालय कोठे आहे? आदी माहिती जरी त्यांना विचारली तरी गुन्हेगार पुढे बोलणे बंद करतात. आजवर घडलेले प्रकार लक्षात घेता समोरच्या व्यक्तीला विचार करण्याची उसंतच ते देत नाहीत. व्हिडिओ कॉल करून तुम्ही आमच्यासमोरच बसून रहा, याविषयी कुटुंबीयांनाही माहिती देऊ नका, तुमची चौकशी सुरू आहे, हे कोणालाच सांगून नका. सांगितलात तर तुमच्याच अडचणी वाढतील, अशी धमकी देऊन सावजाला एकाच ठिकाणी बसविले जाते. त्यामुळेच हा प्रकार डिजिटल अरेस्ट या नावाने ओळखला जातो.
तुमच्या नावे आलेल्या कुरियरमध्ये सीमकार्ड, पासपोर्ट व अमलीपदार्थ आहेत. त्यामुळे तुम्ही मोठ्या गुन्ह्यात अडकला आहात. तुमची तातडीने चौकशी करायची आहे, असे सांगत बोलणे सुरू ठेवतात. अनेक वेळा कॅन्फरन्स कॉलच्या माध्यमातून वेगवेगळ्या गुन्हेगारांशी भेट घडवून ते वरिष्ठ अधिकारी असल्याची बतावरणी करतात. या संकटातून तुमची सुटका व्हायची असेल तर ऑनलाईन चौकशी लवकरात लवकर आटोपून तुम्हाला मुक्त करावे लागेल, असे सांगितले जाते. यासाठी स्काईप अॅप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगतात. एखाद्या सरकारी तपास यंत्रणेप्रमाणेच सुरुवातीला पोलीस, नंतर निरीक्षक, अधीक्षक व शेवटी डीसीपी, आयुक्त असल्याचे भासवून सावजाची चौकशी करतात. या कथित चौकशी दरम्यान सावजाला दुसरा विचार करण्याची संधीच सायबर गुन्हेगार देत नाहीत. त्यामुळेच डिजिटल अरेस्टचे प्रकार वाढले आहेत.
अडीच महिन्यांपूर्वीच जागृती
गेल्या वर्षीच्या डिसेंबरअखेरपासून सायबर गुन्हेगारीचा हा नवा प्रकार सुरू झाला. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून हळूहळू हे प्रकार वाढले. दि. 14 जानेवारी 2024 रोजी ‘भारत लाईव्ह न्यूज मीडिया’ने अशा प्रकारांबद्दल नागरिकांना सावध केले होते. ‘ड्रग्ज तस्करीत गोवण्याची धमकी’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून बेळगाव परिसरातील उद्योजक, राजकीय नेते, बिल्डर आदींना येत असलेल्या फोन कॉलसंदर्भात माहिती देण्यात आली होती. जिल्हा सीईएन विभागाचे तत्कालिन पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा ओळखून नागरिकांना सावध केले होते. सतर्क राहिले तरच असे प्रकार टाळता येतात, असे सांगत त्यांनी खबरदारीचे आवाहन केले होते. आता डिजिटल अरेस्ट या नावाने हे प्रकार वाढले आहेत.
पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर

‘112’ किंवा ‘1930’ आधार घ्या
डिजिटल अरेस्ट म्हणजेच एखाद्या व्यक्तीवर खोटे आरोप करीत त्याला गुन्हेगारीत अडकविण्याची धमकी देत त्याची लूट करण्याचा प्रकार होय. जर सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीसाठी कॉल आला तर त्वरित 112 किंवा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल 1930 वर संपर्क साधला तरी फसवणूक टाळता येते. यापूर्वी फसवणुकीनंतर लवकरात लवकर गोल्डन मिनिटमध्ये 1930 या क्रमांकावर माहिती दिल्यास सायबर गुन्हेगारांचे खाते गोठवले जायचे. आता गोल्डन मिनिटमध्येच गुन्हेगार आपल्या खात्यातील रक्कम दुसरीकडे वळवू लागले आहेत. त्यामुळे फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी निर्भयपणे सायबर गुन्हेगारांना जाब विचारणे गरजेचे आहे.