‘नीट’चा निकाल ‘आश्चर्यकारक’ नाही !
एनटीएकडून सर्वोच्च न्यायालयात प्रत्युत्तर सादर, आज होणार पुढची सुनावणी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
यंदाच्या नीट-युजी प्रवेश परीक्षेचा निकाल असाधारण म्हणता येणार नाही, असे प्रत्युत्तर राष्ट्रीय चाचणी प्राधिकारणाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे सादर केले आहे. 2020 ते 2023 या काळात झालेल्या कोणत्याही नीट-युजी परीक्षेप्रमाणेच हे निकाल आहेत. त्यांच्यात फार मोठे अंतर नाही. तसेच या चार वर्षांमधील कट ऑफ मार्कस्मध्येही कोणते विशेष अंतर नाही. त्यामुळे घोटाळ्याचे आरोप निराधार आहेत, असे या प्रत्युत्तरात पुढे स्पष्ट करण्यात आले आहे.
कट ऑफच्या मार्कांमध्ये दरवर्षीच काही प्रमाणात वाढ होत असते. कारण प्रत्येक वर्षी परीक्षार्थींच्या स्पर्धात्मक कामगिरीत सुधारणा होत असते. तेव्हढ्याच प्रमाणात वाढ यंदाच्या कट ऑफ मार्कांमध्येही दिसून येते. ही वाढ आश्चर्यकारक म्हणता येणार नाही, असे प्रतिपादन प्राधिकरणाने आपल्या प्रत्युत्तरात केले आहे.
विस्तृत विवेचन
सूत्रांच्या माहितीनुसार प्राधिकरणाने गेल्या चार वर्षांमधील या परीक्षांची विस्तृत माहिती प्रत्युत्तरात दिली आहे. 2020 मध्ये या परीक्षेला 13 लाख 66 हजार 945 विद्यार्थी बसले होते. प्रत्येक विद्यार्थ्याने मिळविलेले सरासरी गुण 720 पैकी 297.18 इतके होते. सर्वसाधारण श्रेणीचे कटऑफ गुण (जनरल कॅटेगरी) 147 इतके होते. 2021 मध्ये 15 लाख 44 हजार 273 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यांचे सरासरी गुण 286.134 इतके होते. तर कटऑफ गुण सर्वसाधारण श्रेणीसाठी 138 होते. 2022 मध्ये 17 लाख 64 हजार 571 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यांचे सरासरी गुण 259 तर कटऑफ गुण 117 होते. 2023 मध्ये 20 लाख 38 हजार 596 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यांचे सरासरी गुण 279.41 तर कटऑफ गुण 137 होते. 2024 मध्ये ही परीक्षा 23 लाख 33 हजार 297 विद्यार्थ्यांनी दिली. त्यांचे सरासरी गुण 323.55 आहेत. तर कटऑफ गुण 164 आहेत. यंदा प्रथमच या परीक्षेला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे स्पर्धात्मकताही अधिक असल्याने त्या प्रमाणात गुणांची सरासरी आणि कटऑफ गुण यांच्यात वाढ झालेली दिसून येते. ही वाढ अनैसर्गिक नाही. तर ती प्रमाणबद्धच आहे, असे प्रतिपादन प्राधिकरणाने प्रत्युत्तरात केलेले आहे.
प्रश्नप्रत्रिका फुटीचे आरोप अतिरंजित
अनेक परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका फुटल्याचे आरोप केले जात आहेत. ते अतिरंजित आहेत. गुजरातमधील गोध्रा येथे दोनच केंद्रे होती. तेथे कोणालाही 100 टक्के गुण मिळालेले नाहीत. अत्यल्प विद्यार्थीच 600 हून अधिक गुण मिळवू शकलेले आहेत. गोध्रामधील एका केंद्रावर 1,869 विद्यार्थ्यांपैकी केवळ 804 उत्तीर्ण झाले असून दुसऱ्या केंद्रावरील 654 विद्यार्थ्यांपैकी 268 पात्र ठरले आहेत. बिहारमधील पाटणा येथे 12 केंद्रे होती. या सर्व केंद्रांमधून केवळ एका विद्यार्थ्याला 710 ते 719 गुणश्रेणीत स्थान मिळाले आहे. तर 700 ते 709 या गुणश्रेणीत केवळ 3 विद्यार्थी आहेत. पात्र विद्यार्थ्यांपैकी अधिकतर विद्यार्थी 500 ते 540 या गुणश्रेणीतील आहेत, असेही प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रश्नपत्रिका फुटीचा प्रयत्न अयशस्वी
प्रश्नपत्रिका फोडण्याचा प्रयत्न दोन तीन केंद्रावर झाला असला तरी तो अयशस्वी ठरला आहे. प्राधिकरणाने सर्वोत्तम 100 विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांचे विश्लेषण पेले. हे 100 विद्यार्थी 95 वेगवेगळ्या केंद्रांमधील आहेत. हे केंद्रे 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 56 शहरांमध्ये पसरलेली आहेत. त्यामुळे केवळ पाटणा शहरातील विशिष्ट केंद्रांचा अपवाद वगळता कोठेही प्रश्नपत्रिका फुटलेल्या नाहीत, हे सिद्ध होते. इतर सर्व केंद्रांवर कोणतेही गैरप्रकार झाल्याचे दिसून येत नाही, असे म्हणणे प्राधिकरणाने मांडल्याची माहिती देण्यात आली.
Home महत्वाची बातमी ‘नीट’चा निकाल ‘आश्चर्यकारक’ नाही !
‘नीट’चा निकाल ‘आश्चर्यकारक’ नाही !
एनटीएकडून सर्वोच्च न्यायालयात प्रत्युत्तर सादर, आज होणार पुढची सुनावणी वृत्तसंस्था / नवी दिल्ली यंदाच्या नीट-युजी प्रवेश परीक्षेचा निकाल असाधारण म्हणता येणार नाही, असे प्रत्युत्तर राष्ट्रीय चाचणी प्राधिकारणाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे सादर केले आहे. 2020 ते 2023 या काळात झालेल्या कोणत्याही नीट-युजी परीक्षेप्रमाणेच हे निकाल आहेत. त्यांच्यात फार मोठे अंतर नाही. तसेच या चार वर्षांमधील कट […]