जागेअभावी कॅन्सर रुग्णालयाचा प्रस्ताव रखडला
जिल्हा रुग्णालयाकडे चार एकर जागा उपलब्ध करून देण्याची मागणी
बेळगाव : किद्वाई मेमोरिअल इन्स्टिट्यूटकडून बेळगावमध्ये कॅन्सर रुग्णालय उभारण्यास राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात सदर कॅन्सर रुग्णालय उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र जागेअभावी रुग्णालयाच्या उभारण्याची प्रक्रिया थंडावली आहे. किद्वाई मेमोरिअल इन्स्टिट्यूटकडून कॅन्सर रुग्णालय उभारण्यासाठी राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली होती. वडगाव येथील तालुका रुग्णालयाच्या आवारामध्ये उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र तांत्रिक कारणांमुळे सदर ठिकाण रद्द करून जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच कॅन्सर रुग्णालय उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली होती. यासाठी राज्य सरकारकडून पहिल्या टप्प्यात 50 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अर्थ संकल्पात रुग्णालयाच्या उभारणीसाठी निधीची तरतूद केली होती.
जिल्हा रुग्णालयाच्या आवारात कॅन्सर रुग्णालय उभारण्यासाठी किद्वाई इन्स्टिट्यूटकडून 4 एकर जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. बिम्स् संचालकांकडून जागेचा अभाव असल्याचे सांगून 2 एकर जागा उपलब्ध करून देण्याचे सांगण्यात आले होते. याबाबत जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वामध्ये आढावा बैठक घेण्यात आली होती. बिम्स् प्रशासनाकडून उपलब्ध जागेची माहिती दिली होती. त्यानुसार पालकमंत्र्यांनी जागेचा अभाव लक्षात घेत पर्यायी जागा शोधणे गरजेचे असल्याचे सांगितले होते. यानंतर यावर कोणताच ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे रुग्णालय उभारण्याची प्रक्रिया ठप्प झाली आहे. लोकसभा निवडणुकींची आचारसंहिता लागल्याने कोणताच ठोस निर्णय घेता आला नसल्याचे बिम्स् अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. याबरोबरच किद्वाई इन्स्टिट्यूटकडूनही कोणताच प्रतिसाद देण्यात आला नसल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतरच यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
दोन एकर जागा उपलब्ध करणार…
जिल्हा रुग्णालयाच्या आवारामध्ये अनेक इमारती उभारण्यात आल्या आहेत. सुपरस्पेशालिटी रुग्णालय, तत्काळ चिकित्सा विभाग, वसतिगृहे, विद्यार्थी वसतिगृहे अशा अनेक इमारती आहेत. त्यामुळे जागेचा अभाव असून कॅन्सर रुग्णालयासाठी 4 एकर जागेचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. दोन एकर जागा उपलब्ध करून देण्याचे कळविण्यात आले आहे.
– डॉ. अशोक शेट्टी (बिम्स् संचालक)
Home महत्वाची बातमी जागेअभावी कॅन्सर रुग्णालयाचा प्रस्ताव रखडला
जागेअभावी कॅन्सर रुग्णालयाचा प्रस्ताव रखडला
जिल्हा रुग्णालयाकडे चार एकर जागा उपलब्ध करून देण्याची मागणी बेळगाव : किद्वाई मेमोरिअल इन्स्टिट्यूटकडून बेळगावमध्ये कॅन्सर रुग्णालय उभारण्यास राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात सदर कॅन्सर रुग्णालय उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र जागेअभावी रुग्णालयाच्या उभारण्याची प्रक्रिया थंडावली आहे. किद्वाई मेमोरिअल इन्स्टिट्यूटकडून कॅन्सर रुग्णालय उभारण्यासाठी राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली होती. वडगाव […]