हुदली महालक्ष्मी यात्रेला भक्तिभावाने प्रारंभ

हुदली महालक्ष्मी यात्रेला भक्तिभावाने प्रारंभ

भंडाऱ्याच्या उधळणीत रथोत्सव मिरवणूक : भाविकांची अलोट गर्दी
वार्ताहर /बाळेकुंद्री
लक्ष्मी माता की जय, उदे गं आई उदो…च्या जयघोषात, भंडाऱ्याची उधळण, ढोल, सनईच्या निनादात व हजारो भाविकांच्या उपस्थितीत बुधवारी पहाटेच्या सुमारास बेळगाव तालुक्यातील हुदली येथील महालक्ष्मीचा विवाह सोहळा पार पडला. तब्बल 11 वर्षानंतर या गावची यात्रा भरत असल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साहाचे वातावरण दिसत होते. हजारो भाविकांनी अक्षतारोपण केले. मंगळवारी रात्रीपासूनच देवीची विधीवत पूजाअर्चा पार पडली. पहाटे लक्ष्मी गल्लीच्या प्रांगणात आकर्षक रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या. देवीचा अक्षतारोपणचा सोहळा मोठ्या थाटात पार पडला. यावेळी देवीला अलंकारांनी सजविण्यात आले होते. पहाटे मंदिराभोवती महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
रथोत्सव मिरवणूक लक्षवेधी
बुधवारी सकाळी प. पू अमरसिध्देश्वर यांच्याहस्ते रथाची पूजाविधी झाल्यानंतर  रथोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी महालक्ष्मीचा रथ ओढण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. गावच्या मुख्य रस्त्याच्या मार्गावरून देवीचा रथ जाताना रथावर भाविकांकडून खारीक, खोबरे, पेढे यांची उधळण होत होती. रथ ग्रा.पं. प्रांगणात आणला असून गुरुवारी  गावच्या पिंपळाच्या झाडाजवळील करेम्मा देवीपासून रथोत्सव होणार आहे.  गुरुवारी रात्री 10 वाजता ‘संग्या बाळ्या’ हे नाटक होणार आहे. रथोत्सवावेळी खनगाव, मारिहाळ, तुम्मरगुद्दी, अंकलगी, मोदगा, सुळेभावीतील भाविकांची गर्दी होती.