अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड

सायन्स-कॉमर्स विभागांना पसंती : बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यामध्ये एकूण 145 पदवीपूर्व कॉलेज
बेळगाव : दहावी परीक्षेचा निकाल लागताच अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडू लागली आहे. यावर्षी निकाल कमी लागल्यामुळे प्रवेश मिळविण्यासाठी स्पर्धा कमी होणार आहे. सध्या शहरातील पदवीपूर्व कॉलेजमध्ये प्रवेश अर्ज, तसेच इतर माहिती घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांची गर्दी होत आहे. दहावीचा निकाल गुरुवार दि. 9 रोजी जाहीर करण्यात आला. परंतु त्यानंतर सलग सुट्या आल्यामुळे कॉलेज बंद होती. सोमवारपासून कॉलेजमधील प्रवेश अर्ज मिळविण्यासाठी विद्यार्थी व पालकांची गर्दी होत आहे. कॉमर्स व सायन्स विभागांना विद्यार्थ्यांची पसंती दिसून येत आहे. यावर्षी निकाल जरी कमी लागला असला तरी विद्यार्थ्यांची टक्केवारी मात्र वाढली आहे. 90 टक्क्यांहून अधिक गुण घेणाऱ्यांची संख्या शहरात अधिक असल्यामुळे सायन्स विभागाला अर्ज करणाऱ्यांना स्पर्धा करावी लागणार आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यामध्ये एकूण 145 पदवीपूर्व कॉलेज आहेत. बेळगावसह खानापूर, बैलहोंगल, कित्तूर, सौंदत्ती, गोकाक व रामदुर्ग या तालुक्यांमध्ये 30 सरकारी, 40 अनुदानित तर 75 विनाअनुदानित पदवीपूर्व कॉलेज आहेत. निकालाचा टक्का पाहता यंदा विद्यार्थी प्रवेशाविना राहणार नसल्याची शक्यता वर्तविली जात आहे. अकरावीबरोबरच बरेच विद्यार्थी आयटीआय, डिप्लोमा, नर्सिंग यासह इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना दिसत आहेत. यामुळे कॉलेज परिसर गर्दीने फुलले आहेत.
टप्प्याटप्प्याने प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार
अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सरकारी, अनुदानित व विनाअनुदानित कॉलेजमध्ये विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. विद्यार्थी प्रवेशाविना राहणार नाहीत, याची काळजी पदवीपूर्व विभागाने घेतली आहे. टप्प्याटप्प्याने प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.
– एम. एम. कांबळे (पदवीपूर्व विभागाचे शिक्षणाधिकारी)

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील पदवीपूर्व कॉलेजची संख्या

सरकारी कॉलेज…………………………30
अनुदानित कॉलेज……………………..40
विनाअनुदानित-खासगी कॉलेज…..75