तिलारी धरणात मुलगी बुडाली

तिलारी धरणात मुलगी बुडाली

हजगोळी चाळोबा परिसरातील घटना : वडिलांना वाचविण्यात यश
वार्ताहर /तुडये
सुळगा (हिं.) येथील सलोमन जमूला हे आपल्या दोन मुलीसह हजगोळी (ता. चंदगड) येथील चाळोबा देवालय परिसरात फिरण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांची एक मुलगी चाळोबा देवालय परिसरातील तिलारी धरण पाणलोटक्षेत्रात बुडाली. सदर घटना बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. फिवोना सलोमन जमूला (वय 11, रा. आंबेडकर गल्ली. सुळगा, हिंडलगा, बेळगाव) असे बुडालेल्या मुलीचे नाव आहे. या घटनेत तिच्या वडिलांना वाचविण्यात यश आले आहे. याबाबतची घटना अशी, सुळगा (हिं.) येथील चर्चमधील वॉचमन सलोमन जमूला हे आपल्या दोन मुलींसह चाळोबा परिसरात बुधवारी दुपारी आले होते. या टेकडीच्या सभोवती असलेल्या पश्चिम बाजूला तिलारी धरणाच्या पाण्यात ते उतरले. या ठिकाणी असलेल्या खोल पाण्याचा अंदाज त्यांना न आल्याने एक मुलगीसह ते बुडू लागले. तातडीने दुसऱ्या मुलीने वडिलांना आपल्या बहिणीसह बुडताना पाहून मदतीसाठी आरडा ओरड केली. त्यामुळे जवळच असलेल्या युवकांनी दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी वडिलांना पाण्याबाहेर काढले व त्यांच्यावर प्राथमिक उपचारासाठी पाठविले. या ठिकाणी 25 फूट पाण्याची खोली असल्यामुळे बुडालेली मुलगी सापडली नाही.