औषध घातलेले सफरचंद खाल्ल्याने सुटीवरील लष्करी जवानाचा मृत्यू

औषध घातलेले सफरचंद खाल्ल्याने सुटीवरील लष्करी जवानाचा मृत्यू

बेळगाव : उंदीर मारण्यासाठी औषध घालून ठेवलेले सफरचंद खाल्ल्याने सुटीवर आलेल्या लष्करी जवानाचा मृत्यू झाला आहे. मार्कंडेयनगर-नंदी (ता. बेळगाव) येथे ही घटना घडली आहे. लष्करी जवानाच्या अकाली मृत्युमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बसाप्पा हणमंत माळंगी (वय 24) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. तो सध्या जम्मू-काश्मीरमध्ये लष्करी सेवेत होता. 16 एप्रिल रोजी तो सुटीवर गावी आला होता. त्यांच्या घरी उंदरांचा उपद्रव वाढला होता. त्यामुळे रविवार दि. 12 मे रोजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास सफरचंदमध्ये उंदीर मारण्याचे औषध घालून ठेवण्यात आले होते. औषध घातलेले सफरचंद एका भिंतीवर ठेवण्यात आले होते. मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास बसाप्पाने नकळत सफरचंद खाल्ल्यामुळे तो अत्यवस्थ झाला. सफरचंदमध्ये औषध आहे, याची कल्पना त्याला नव्हती. त्यामुळे त्याची प्रकृती खालावली. त्याला तातडीने खासगी इस्पितळात हलविण्यात आले. उपचाराचा उपयोग न होता मंगळवार दि. 14 मे रोजी रात्री त्याचा मृत्यू झाला. बसाप्पाचे वडील हणमंत माळंगी यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. सीआरपीसी कलम 174 अन्वये अनैसर्गिक मृत्यू प्रकरणाची नोंद झाली आहे. बुधवारी उत्तरीय तपासणी करून या जवानाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. बेळगाव ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.